नगरमध्ये बहिणीच्या घरावर डल्ला मारणाऱ्या भावाला अटक; 16 लाखांचा मुद्देमाल जप्त 

नगरच्या एम.आय.डी.सी परिसरामध्ये राहणाऱ्या बहिणीच्या घरावर डल्ला मारणाऱ्या भावाला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून 16 लाख 18 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सुरज प्रकाश लोढा वय 29 वर्षे असे आरोपीचे नाव असून तो सावली सोसायटी, भुषणनगर परिसरात वास्तव्याला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,  सुजय सुनिल गांधी वय 33 वर्षे यांचा माताजी नगर, जिमखाना, एम.आय.डी.सी या ठिकाणी किराणा दुकानाचा व्यावसाय आहे. यांच्याकडे आरोपीने चोरलेले 7,33,000 रुपयांचे दागिने दिले होते. पोलिसांचे पथक त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर नगर शहरातील पतसंस्था, गोल्ड लोन देणारे व्यावसायीक आणि फायनान्स कंपन्यांकडे गहाण ठेवलेल्या सोन्याची माहिती घेत होते. याचवेळी आरोपीने मुथुट फायनान्स कंपनीमध्ये काही सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्याची माहिती पोलिसांना सुत्रांच्या आधारे प्राप्त झाली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता आरोपी सुरज लोढा याच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद आढळून आल्यामुळे पोलिसांनी सुरज लोढाला ताब्यात घेतले आणि चौकशीला सुरुवात केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर सुरजने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी सुरज लोढा याने पोलिसांना दिलेल्या जबाबा नुसार, 30 डिसेंबर रोजी त्याची बहिणी व बहिणीच्या घरातील लग्नसमारंभाकरीता बुरुंडगांव रोड, नगर येथे जाणार असल्याची माहिती त्याला आधीपासूनच होती. बहिणीच्या घरातील सर्व लग्नाला गेल्यानंतर त्याने घराचे कुलूप तोडले आणि सोने व रोख रक्कम ठेवलेलल्या तिजोरीची चोरी केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपी सुरज लोढाकडे चोरी केलेले 13 लाख 26 हजार 400 रुपये किमतीचे 221 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2 लाख 4 हजार 500 रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्याच्या वेळी वापरलेले 16 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, 70 हजार रुपये किमतीची मोटारसायकल, 2 हजार रुपये किमतीचे तिजोरी कापण्यासाठी वापरलेले ग्राइंडर असा एकुण 16 लाख 18 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले व नगर ग्रामीण विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील तुषार धाकराव, संदीप पवार, रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, विजय ठोंबरे, सचिन अडबल, संतोष लोढे, संतोष खैरे, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, अमृत आढाव, आकाश काळे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, व अरुण मोरे अशा पोलीस अंमलदारांच्या पथकाला सोबत घेऊन कारवाई करत आरोपीला जेरबंद केले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासासाठी एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास एम.आय.डी.सी.पोलीस करत आहेत.