लातूरातील लाचखोर शाखा अभियंत्याला 3 वर्ष सश्रम कारावास, 5 हजार रूपये दंडाची शिक्षा

लातूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर येथील शाखा अभियंता विद्युत दत्तात्रय राजाराम पडवळ यांनी 6 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दत्तात्रय राजाराम पडवळ यांना 3 वर्ष सक्षम करावास आणि 5000 रूपये दंडची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास परत 6 महिने शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

फिर्यादी प्रशांत भोयरेकर हे शासकीय कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्यालयात एसी बसवणे व दुरूस्त करणे याची कामे करतात. फिर्यादी भोरेकर यांनी १८/११/२०१५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील शल्यचिकीत्सा शस्त्रक्रिया गृहातील वातानुकुलक यंत्राची कॉम्प्रेसर बदलण्याचे काम व कॉपर पाईप बदलण्याचे काम पूर्ण केले होते. त्याचे बिल पेंडींग होते. तसेच १६/१/२०१६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पशुसंवर्धन विभागास 4 एसी बसवल्या होत्या. त्याचे बिल फिर्यादीला मिळाले होते. त्या काढलेल्या बिलाचे 10 हजार रुपये आधी, द्या नंतर दुसरे बील काढतो, असे सांगत आरोपी दत्तात्रय पडवळ यांनी फिर्यादीकडे 10 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. फिर्यादीने लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आरोपी दत्तात्रय पडवळ यांचे विरूध्द तकारी अर्ज दाखल केला.

मिळालेल्या माहितीच्या आधारे लाचलुचपत प्रतीबंधक कार्यालयातील अधिकारी यांनी आरोपी दत्तात्रय पडवळ यांचेवर सापळा. लावला व त्यात त्यांनी लाच मागितल्याचे व घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तपास अधिका-याने सदर केसचा तपास करून आरोपी विरूध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने 6 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा पुरावा व युक्तीवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आरोपी दत्तात्रय राजाराम पडवळ यास कलम 7 लाच प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये 3 वर्ष सश्रम कारावास व 5000 दंड तसेच दंड न भरल्यास परत 6 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात सहा. सरकारी वकील म्हणून रमाकांत पी. चव्हाण (पाखरसांगवीकर) यांनी काम पाहिले व त्यांना पोलीस हेडकॉन्स्टेबल भागवत कठारे यांनी सहकार्य केले.