Border Gavaskar Trophy 2024 – ऑस्ट्रेलियाला तगडा झटका, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड ॲडलेड कसोटीतून बाहेर

बॉर्डर गावस्कर करंडकातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने धमाकेदार प्रदर्शन करत 295 धावांनी ऐतिहासिक विजय साजरा केला. या विजयासोबत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरला सुरू होणार आहे. अशातच ऑस्ट्रेलियाला तगडा झटका बसला असून वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड दुसऱ्या कसोटी सामन्यातू बाहेर झाला आहे.

पर्थ कसोटीमध्ये जोश हेजलवूडने दमदार गोलंदाजी केली होती. त्यामुळे टीम इंडियाचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला होता. हेजलवूडने पहिल्या डावात 29 धावांमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या. तसेच दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली होती. टीम इंडियाचा दुसरा कसोटी समाना ॲडलेडमध्ये पार पडणार आहे. या मैदानावर जोशचा ‘जोश’ नेहमीच हाय राहिला आहे. मागच्या वेळी जेव्हा टीम इंडियाचा ॲडलेड येथे सामना पार पडला होता, तेव्हा हेजलवूडने टीम इंडियाच्या फलदाजांना धक्यावर धक्के देत फक्त 8 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीला हेजलवूड मुकणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

जोश हेजलवूडच्या अनुपस्थितीमध्ये एकही कसोटी सामना न खेळलेल्या वेगवान गोलंदाज सीन एबॉट आणि ब्रॅंडन डोगेट यांना ॲडलेड कसोटी सामन्यात संधी देण्यात येईल अशी शक्यता आहे. एबॉटने ऑस्ट्रेलियाकडून 26 वनडे आणि 20 टी-20 सामने खेळले असून त्याच्या नावावर 55 विकेट आहेत. त्याचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण झालेले नाही. मात्र, जोश हेजलवूडच्या जागेवर पर्थ कसोटीमध्ये खेळण्याची संधी न मिळालेल्या स्कॉट बोलँडचा समावेश निश्चित मानला जात आहे. बोलॅंड शेवटचा कसोटी सामना जुलै 2023 मध्ये खेळला होता.