भक्तिसागर 65 एकरांत 180 भूखंडांचे बुकिंग; छोट्या-मोठ्या दिंड्यांचे आगमन

आषाढी वारीसाठी दिंड्यांच्या निवासाची 65 एकर मैदानात बुधवारी दुपारपर्यंत 497 प्लॉटपैकी 180 भूखंडांचे बुकिंग झाले होते. काही दिंड्यांनी आपले साहित्य प्लॉटवर आणून ठेवण्यास सुरुवात केली आहे. येथील सुमारे 3 लाख भाविकांना सर्व मूलभूत सुविधा पुरवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. भक्तिसागरात भाविक दाखल होऊ लागल्याने आषाढी वारीचा भास होऊ लागला आहे.

आषाढी यात्रा सोहळ्यासाठी अनेक संतांच्या पालख्या, दिंड्यांचे सोलापूर जिह्याच्या सीमेजवळ आल्या आहेत. काही पालखी सोहळे जिह्यात दाखल झालेत. तर संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम यांच्या पालख्यांचे जिह्यात आज दि. 11 व 12 जुलै रोजी आगमन होणार आहे. त्याअनुषंगाने पूर्वतयारी सुरू केली आहे.

पंढरपुरातील 65 एकर येथे एकूण 497 भूखंड आहेत. बुधवारी 180 भूखंडांचे बुकिंग झाले आहे. पावसाची शक्यतेने काही प्लॉटवर दिंड्यांनी तंबू टाकण्यास सुरुवात केली आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. येथे भाविकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार आहेत. यासाठी नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे, नायब तहसीलदार प्रवीणकुमार वराडे यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मदतीसाठी केंद्र

भक्तिसागर येथे भाविकांना निवाऱ्यासोबत पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, वीज कनेक्शन, अन्नपदार्थ शिजवण्यासाठी गॅस वितरण, पोलीस संरक्षण, प्रथमोपचार केंद्र, 108 क्रमांकाची रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा याशिवाय सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. आपत्कालीन मदत केंद्र स्थापन करण्यात आले असून, तहसीलदार सचिन मुळीक सेक्टर मॅनेजर आहेत.