परीक्षण – मनपटलावरील पडघम

>> डॉ. अनुपमा उजगरे 

एखाद्या घराची खिडकी किंचित उघडी असेल तर त्यात डोकावून पाहण्याचा मोह भल्याभल्यांना होतो. त्यामुळेच आत्मचरित्राचा वाचक वर्ग खूप मोठा आहे. दुसऱयाच्या आयुष्यात काय चालले आहे हे पाहणे जर इतकी स्वभाविक वृती असेल तर माणूस समोर असता त्याच्याशी संवाद करणे हेही तितकेच स्वाभाविक आहे. जिथे आपल्याच माणसाच्या मनाचा थांग आपल्याला लागत नाही तिथे दुसऱयाच्या मनात डोकावून बघणे अधिकच कठीण बाब होऊन बसते. दुसऱयाच्या मनाचा कप्पा किंचित किलकिला करणे साध्य होतेच असं नाही. मनाची अस्वस्थता, वैयक्तिक कारणाने असो वा आणखी कुठल्याही, ती संवादाने दूर  होऊ शकते आणि सकारात्मक काही घडू शकतं असा सूर विद्या निकम यांच्या ‘अस्वस्थ मनाचे पडघम ‘ ह्या सार्थ शीर्षक असलेल्या ललित लेखसंग्रहात सर्वत्र गुंजत राहिलेला जाणवतो .

बागेतल्या झाडाजवळ ठराविक वेळी येऊन झाडाच्या बुंध्यातून उगवल्यासारखी निश्चल बसून नंतर ठराविक वेळेत निमूटपणे निघून जाणाऱया परग्रहावरची वाटावी अशा एका बाई विषयी लेखिकेला कुतूहल वाटते आणि तिच्याशी संवाद साधावा असे वाटू लागते. पॅपेतच्या परदेशी असलेल्या तरुण मुलाचा मृत्यू, हा धक्का सहन न होऊन अर्धांगवायू झालेला चर्चच्या क्वायर ग्रुपमध्ये व्हायोलिन वाजवणारा पॅपेतचा नवरा अलेक्स, या गोष्टीमुळे जगण्याला सामोरं जायला घाबरणारी पॅपेत लेखिकेला अस्वस्थ करते. आपले पेटी वादन बाळबोध आहे याचे लेखिकेला पुरते भान असूनही एक दिवस ती आपला हार्मोनियम घेऊन सुरांचा पक्का असलेल्या अॅलेक्स समोर जाते. त्याचे लक्ष पुन्हा संगीताकडे वेधू पाहते आणि पॅपेतच्या मदतीने त्याला व्हॉयोलिन वाजवायला प्रवृत्त करते. त्या व्हॅयोलियन वादनातून त्या जोडप्याला सहजीवनचा नवा सूर सापडतो. आपल्या एका अल्पशा कृतीतून हे घडू शकते याचे अपार समाधान लेखिकेला लाभते.

हातीपायी धडधकट असलेले, जीवनातील लहान-सहान त्रुटी अनेकजण सहन करू शकत नाही. एवढय़ा तेवढय़ासाठी देवाला आणि दैवाला वेठीस धरणाऱयानी सुधाकर-रेणुका या अंध युगलांच्या भेटीचा प्रसंग वाचला तर तो त्यांच्या नुसता काळजाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही तर जीवनाकडे बघण्याची त्यांची दृष्टीदेखील सकारात्मक करील.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून दुसऱयाच्या घरची धुणी भांडी करून कोल्हापूरची अनुराधा एम एस डब्ल्यू होते. लग्नानंतरच्या सर्व जबाबदाऱया निभावून सासरचा जाच सहन करत सामाजिक बांधिलकी म्हणून बालमजुरांना, तळागाळातल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देते. हॉटेल, गॅरेज, दुकानांमध्ये काम करणाऱया बालमजुरांची सुटका करते. त्याकरता ती ‘अवनी’ नावाची संस्था काढते. विधवा, घटस्फोटीत महिलांसाठी ‘एकटी’ नावाची संस्था सुरू करते. अमेरिकेतील पीस फाउंडेशन तिच्या मदतीला धावून येते. विवेक आणि प्रभावी विचार ह्या तिच्या जवळच्या भांडवलच्या जोरावर  हिंसा, आरोग्य, रोजगार आणि कायदेविषयक सजगता असे चार परिवर्तनवादी प्रवाह एकत्र करून आपली चळवळ नियोजित पद्धतीने चालू ठेवते. अनुराधाचा हा प्रवास बराचसा, शतकापूर्वी पंडिता रमाबाईंनी ‘एकला चलो रे’ पद्धतीने केलेल्या भारतीय स्त्राr विषयक कार्याचे आणि त्यांना असलेल्या तळमळीचे स्मरण करून देणारा आहे.

या ललित लेखांमधील  लेखिकेला भेटलेली स्त्राr पात्रे लक्षवेधी आहेत. बाईचं उपजत शहाणपण आणि तिचं आत्मभानदेखील अधोरेखित करते. जीवनातला साधेपणा, जिवंतपणा, सहजता टिकवण्याकरीता संहाराला सर्जनता हेच उत्तर आहे अशी चिकिस्तक स्वतंत्रदृष्टी लेखिकेला गवसली आहे. लेखिकेच्या मनपटलावर वाजू लागलेले पडघमचे पडसाद वाचकांच्या मनावर  उमटविण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

अस्वस्थ मनाचे पडघम

लेखिका : विद्या निकम

प्रकाशक : अष्टगंध प्रकाशन

पृष्ठे : 126   किंमत : 250रु.