पीडितेला कोणी धमकावले तर आम्ही आहोत, काळजी करू नका, हायकोर्टाने ठणकावले

बदलापूर बाल अत्याचार प्रकरणातील पीडितेला कोणी धमकावले तर आम्ही आहोत. काळजी करू नका, असे उच्च न्यायालयाने बुधवारी ठणकावले. या गुह्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचा व दोषी पोलीस अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य शासनाला दिले. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

पीडितेला धमकावले जाण्याची शक्यता आहे, असा दावा अ‍ॅड. अजिंक्य गायकवाड यांनी केला. पीडितेला कोणी धमकावत असेल तर पोलिसांत तक्रार करा. पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही तर आम्हाला सांगा, आम्ही योग्य ते आदेश देऊ. काळजी करू नका, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

दोषी पोलीस अधिकाऱ्यांचाही मुद्दा अ‍ॅड. गायकवाड यांनी उपस्थित केला. या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही, असे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितले. अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू असल्याने यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. याचा अहवाल आल्यानंतर आदेश दिले जातील, असे खंडपीठाने नमूद केले. यावरील पुढील सुनावणी सहा आठवड्यांनी होणार आहे.

काय आहे प्रकरण

बदलापूर येथील शाळेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. यात कारवाई होत नसल्याने स्थानिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केले. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत हे संपूर्ण प्रकरण सुओमोटो सुनावणीसाठी दाखल करून घेतले आहे.

पीडितेला इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश

पीडितेला इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरटीई कायद्यांतर्गत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पीडितेला मनोधैर्य योजनेचे पैसे देण्यात आले आहेत, अशी माहिती महाधिवक्ता सराफ यांनी न्यायालयाला दिली.