Akshay Shinde Encounter – नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? मग बाकीच्या दोन गोळ्या कुठे गेल्या? हायकोर्टाचे पोलिसांना सवाल

बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवरून पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे. तसेच अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांनीही पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी अक्षय शिंदेच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी झाली. या सुनावणीत हायकोर्टाने पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली. नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? चार पोलिसांवर एक आरोपी वरचढ ठरला हे समजणं थोडं कठीण जातंय. रिव्हॉल्व्हर चालवणं हे सामान्य माणसासाठी शक्य आहे का? असे सवाल हायकोर्टाने सुनावणीदरम्यान केले.

एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमध्ये अक्षय हा एकटा आरोपी होता. आरोपीला दुसरीकडे घेऊन जाताना तो आक्रमक होईल अशी कोणतीही लक्षणे त्याच्याकडे नव्हती. नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? की हातावर किंवा पायावर मारता? त्या गाडीत जे पोलीस अधिकारी होते ते पूर्णपणे प्रशिक्षीत आणि पारंगत होते. अशा चार व्यक्ती आणि त्यांच्याबरोबर एक अधिकारी ज्याने अनेक एन्काऊंटर यशस्वी केले आहेत, अशा पोलीस अधिकाऱ्यासमोर तो एकटा आरोपी वरचढ ठरून पोलीस अधिकाऱ्यांचे पिस्तुल हिसकावून गोळीबार कसे काय करेल ? असे सवाल हायकोर्टाने पोलिसांना केला.

अक्षय शिंदेला पोलीस व्हॅनमधून नेत असताना पिस्तुल लॉक का केले नव्हते? पोलिसांनी एवढा निष्काळजीपणा कसा केला? आरोपीने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक पोलिसाला लागली, असे तुम्ही सांगता मग बाकीच्या दोन गोळ्या कुठे गेल्या? असा अनेक प्रश्नांचा भडीमार करीत हायकोर्टाच्या खंडपीठाने सरकारी वकिलांना धारेवर धरले.