कॉलेजमध्ये हिजाबबंदी योग्यच; मुंबई हायकोर्टाने फेटाळली विद्यार्थिनींची याचिका

महाराष्ट्रातील शाळा-कॉलेजेसमधील हिजाबबंदीवर मुंबई हायकोर्टाचा निर्णय आला आहे. काही विद्यार्थिनींनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. कॉलेजेसमधील हिजाबबंदी योग्य असल्याचे हायकोर्टाने नमूद केले आहे.

मुंबईतील एका कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाब घालण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. कॉलेज परिसरातील हिजाबबंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाने नकार दिला. त्यासोबतच कॉलेजमध्ये हिजाबबंदीचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले. कोर्टाच्या या निर्णयाने राज्यातील शाळा-कॉलेजेसमध्ये नियमानुसार ड्रेस कोड लागू राहील. म्हणजेच बुरखा किंवा हिजाब घालून शाळा-कॉलेजेसमध्ये प्रवेश करता येणार नाही.

मुंबईतील चेम्बूरमधील आचार्य-मराठा कॉलेजने ड्रेस कोडनुसार हिजाबबंदी केली आहे. कॉलेज प्रशासनाच्या हिजाबबंदीच्या निर्णयाला कॉलेजमधील 9 विद्यार्थिनींनी हायकोर्टात याचिका दाखल करत आव्हान दिले होते. हिजाबबंदी म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे, असा दावा याचिकेतून करण्यात आला होता. हिजाब, बुरखा, नकाब, टोपी, बॅज, स्टोलवर बंदी म्हणजे आपल्या मूलभूत आणि खासगी तसेच पसंतीच्या अधिकाराविरोधात आहेत. कॉलेजची मनमानी ही कायद्याविरोधात आहे, असे याचिकेत म्हटले होते.