आता दिल्ली-लंडन विमानात बॉम्बची धमकी, बॉम्बच्या धमकीचा सिलसिला सुरूच

दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या विस्तारा कंपनीच्या फ्लाईट यूके-17 या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली. सोशल मीडियावरून धमकी मिळताच हे विमान फ्रँकफर्टला वळवण्यात आले. या ठिकाणी अडीच तासांच्या वेळेत तपासणी करण्यात आल्यानंतर विमानात संशयास्पद असे काहीही आढळले नाही. गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्थानी विमानात बॉम्बची धमकी देण्याचा सिलसिला सुरू आहे. गेल्या सहा दिवसांत तब्बल 22 वेळा बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. एअर इंडिया, इंडिगो आणि विस्तारा कंपनीच्या फ्लाईटला सतत धमकी मिळत असल्याने केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून विमानात एअर मार्शलची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, गृह मंत्रालयाने विमान वाहतूक मंत्रालयाकडूनही अहवाल मागवला आहे. याआधी 16 ऑक्टोबरला धमकी देणाऱ्या आरोपीची ओळख पटली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तसेच सर्व सायबर युनिट्सना धमकी देणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंटस्चा मागोवा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश खाती परदेशातून चालवली जात आहेत.

17 ऑक्टोबर रोजी फ्रँकफर्ट-मुंबई विस्ताराच्या फ्लाईटला धमकी मिळाली होती. धमकी नंतर या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. 16 ऑक्टोबर रोजी इंडियन एअरलाईन्सच्या 7 विमानांत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. 9 ऑक्टोबरला लंडन-दिल्ली फ्लाईटमध्ये टिश्यू पेपरवर लिहून बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती.

एका अफवेमुळे 3 कोटींचे नुकसान

अवघ्या सहा दिवसात 50 हून अधिक विमानांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. यामुळे विमान कंपन्यांचे तब्बल 80 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी 20 हून अधिक विमानांना धमकी मिळाली आहे. परंतु, या सर्वांची माहिती अद्याप समोर आली नाही. धमकी मिळाल्यामध्ये मुंबई-इंस्ताबूल, दिल्ली-इंस्ताबूल, जोधपूर-दिल्ली, उदयपूर-मुंबई या फ्लाईटचा समावेश आहे. विमानात बॉम्ब असल्याच्या एका धमकीमुळे विमान कंपनीला 3 कोटी रुपयांचे नुकसान होते. धमकीनंतर इमर्जन्सी लँडिंगनंतर संपूर्ण विमानाची तपासणी करण्यासाठी ऑपरेटिंग क्रूची नवी जोडी व्यवस्था करावी लागते. खोट्या धमकीमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.