बॉलीवूडचे आयकॉनिक ड्रमर आणि तालवादक फ्रँको वाझ (69) यांचे बुधवारी निधन झाले. आपल्या पाच दशकांच्या संगीतसृष्टीतील कारकीर्दीत फ्रँको यांनी बॉलीवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडली होती.
वयाच्या सातव्या वर्षापासून फ्रँको व्हायोलीन वादन करायचे. सुरुवातीच्या काळात त्यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, शंकर-जयकिशन, दत्ता डावजेकर यांच्या गाण्यांसाठी त्यांनी व्हायोलीन वादन केले. पुढे त्यांनी लेस्ली गुडिन्हो यांच्याकडून ड्रम वादनाचे धडे गिरवले. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी फ्रँको यांनी ‘कसमे वादे निभाएंगे हम’ या गाण्यासाठी ड्रम वादन केले. पंचमदा यांनी त्यांना पहिला ब्रेक दिला. पुढे पंचमदा यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांसाठी काम केले. पंचमदा यांच्या टीममधील मुख्य ड्रमर म्हणून ते ओळखले जायचे. देशविदेशात त्यांनी पंचमदा यांच्यासोबत अनेक स्टेज शो केले. आपल्या कारकीर्दीत फ्रँको यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी- आनंदजी, बप्पी लहरी, इलाईराजा, उत्तम सिंग, ओ.पी. नय्यर अशा अनेक आघाडीच्या संगीतकारांसोबतदेखील काम केले. ‘पापा कहते है’, ‘आ देखें जरा’, ‘रॉकी मेरा नाम’, ‘ओह मारिया’ अशा अनेक गाजलेल्या गाण्यांमध्ये त्यांच्या ड्रम वादनाची जादू ऐकायला मिळते.