बंगालमध्ये पूरपरिस्थिचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या खासदार, आमदारांची बोट नदीत उलटली

पश्चिम बंगालमधील मुसळधार पावसाचा हाहा:कार सुरू असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत ग्राऊंड झिरोवर उतरल्या असून तृणमूल काँग्रेसचे खासदार, आमदारही त्यांच्यासोबत आहेत. यादरम्यान दरम्यान बीरभूम जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली असून पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या खासदार, आमदारांची बोट नदीमध्ये उलटली.

बीरभूम जिल्ह्यातील लवपूर येथील जवळपास 15 गावांना पुराचा वेढा बसला असून शेकडो घरं पाण्याखाली बुडाली आहेत. अनेक लोक पुरामध्ये अडकले आहेत. काही गावांचा संपर्कही तुटला आहे. याचा आढावा घेण्यासाठी बीरभूमचे जिल्हाधिकारी बिधान रॉय, जिल्हा पोलीस अधिक्षक राजनारायण मुखोपाध्याय, खासदार समीरुल इस्लाम आणि असित मल, लवपूरचे आमदार अभिजीत सिन्हा हे इतर अधिकाऱ्यांसह पूरपरिस्थितीचा येथे पोहोचले होते. मात्र त्यांची स्पीडबोट नदीमध्ये उलटली. यामुळे खळबळ उडाली.

ही घटना घडली तेव्हा स्पीडबोटीमध्ये खासदार, आमदारासह जवळपास 13 जण होते. याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत 12 जणांना नदीतून सुखरूप बाहेर काढले. मात्र एक जण बेपत्ता आहे. बेपत्ता व्यक्ती नक्की कोण हे समोर आलेले नाही. त्याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. धक्कादायक म्हणजे पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या खासदार, आमदार, जिल्हाधिकाऱ्यांनी लाईफ जॅकेटही घातले नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, बंगालमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. यामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. यात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ममता बॅनर्जी यांचे सल्लागार अलपन बंद्योपाध्याय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच बीरभूम, बांकुरा, हावडा, हुगली, उत्तर आणि दक्षिण 24 परगना, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बर्धमान या जिल्ह्यातील काही भाग जलमय झाल्याचेही त्यांनी सांगितले.