आर्थिक डोलारा डळमळीत झालेल्या ‘बेस्ट’ला पालिकेने पुन्हा एकदा 500 कोटींची मदत दिली आहे. यामुळे ‘बेस्ट’च्या कर्मचाऱयांची देणी देणे, नव्या बस खरेदी करण्यासाठी ‘बेस्ट’ला याचा फायदा होणार आहे. या मदतीमुळे पालिकेने ‘बेस्ट’ला आतापर्यंत केलेल्या मदतीचा आकडा आठ हजार कोटींवर गेला आहे.
रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाइफलाइन असलेल्या ‘बेस्ट’मधून दररोज 35 लाख मुंबईकर प्रवास करतात. त्यामुळे मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती खालवल्याने कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.
एकेकाळी ‘बेस्ट’ बसेसची संख्या स्वतःच्या पाच हजार बसेसची संख्या आता 2978 वर आली आहे. यामध्ये भाडेतत्त्वावरील बसेसचाही समावेश आहे. शिवाय दररोजच्या 42 ते 45 लाख प्रवाशांची संख्या आता 30 ते 35 लाखांवर आली आहे. आर्थिक स्थिती ढासळल्याने ही स्थिती ओढावल्यामुळे पालिका ‘बेस्ट’ला दरवर्षी कोटय़वधीची मदत करीत आहे.
सन 2014-15 पासून मुंबई महानगरपालिकेकडून बेस्ट उपक्रमाला आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. आतापर्यंत 8069.18 हजार कोटींहून अधिकची मदत करण्यात आली आहे, तर ‘बेस्ट’ने अर्थसंकल्पात पालिकेकडे तीन हजार कोटी देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर ही आता 500 कोटींची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा निधी ‘बेस्ट’ला अदा केला जाणार असल्याचे समजते.
‘बेस्ट’ला पालिकेची अशी मिळतेय मदत
‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकांनी काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांना पत्र लिहून बेस्टला उपक्रमाला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच बेस्टच्या परिवहन विभागास अंदाजे दरमहा 150 कोटी ते 180 कोटी रुपये इतकी आर्थिक तूट असल्याचे नमूद केले आहे. तर जुलै 2023 पर्यंत एकूण आर्थिक तूट 744.95 कोटी रुपये एवढी असल्याचे नमूद केले आहे.
सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन सन 2019-20 पासून ते सन 2023-24 मधील 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेल्या तरतुदींमधून 3425.32 कोटी रुपये व तरतुदींव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान रक्कम म्हणून 4643.86 कोटी रुपये असे एकूण 8069.18 कोटी एवढय़ा रकमेचे अधिदान महापालिकेने ‘बेस्ट’ला केले आहे.