भाजपचा महिलाविरोधी चेहरा उघड, मध्य प्रदेशात फक्त 7 टक्के महिलांना उमेदवारी

आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली आहे. आधी 39 आणि आता 39 अशी एकूण 78 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने पहिल्या यादीत 5 महिलांना तर दुसऱया यादीत 6 महिलांना उमेदवारी देत दोन्ही यादीत केवळ 7 टक्के महिलांना उमेदवारी दिली आहे. भाजपचा महिलांविरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपच्या करणी आणि कथनीतील फरक पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसत आहे.

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर केले. महिलांना 33 टक्के आरक्षण मिळावे अशी सर्वपक्षीयांची मागणी आहे. त्यामुळे लोकसभेत फक्त 2 मते विरोधात पडली. तर राज्यसभेत एकही मत विधेयकाच्या विरोधात पडले नाही. परंतु, महिला आरक्षण विधेयक केवळ भाजपमुळे शक्य झाले असा खोटा प्रचार भाजपकडून चालवला जात आहे. भाजपला महिलांना 33 टक्के आरक्षण खरेच द्यायचे असते तर त्यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत ते दिले असते. परंतु, या दोन्ही यादीत फक्त 7 टक्के महिलांना उमेदवारी देऊन भाजपने आपला खरा चेहरा दाखवला आहे.

पहिल्या यादीत भाजपने सरला विजेंद्र रावत, प्रियंका मीणा, ललिता यादव, अंचल सोनकर, निर्मला भूरिया यांना तर दुस्रया यादीत इमरती देवी, रिती पाठक, ज्योती डेहरिया, गंगाबाई उईके, नंदा ब्राम्हणे, संगीता चारेल अशा सहा महिलांना उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजपने 78 उमेदवारांपैकी 11 महिलांना उमेदवारी जाहीर केली आहे. या 11 पैकी 10 जागांवर भाजपचा मागील विधानसभा निवडणुकीत म्हणजेच 2018 मध्ये पराभव झालेला आहे. केवळ एकाच जागेवर भाजपला विजय मिळालेला असून या ठिकाणी पराभव दिसत असल्याने भाजपने या निवडणुकीत केदारनाथ शुक्ला यांना डावलून रीती पाठक यांना उमेदवारी दिली आहे.

उमेदवार आणि मतदारसंघ
इमरती देवी डबरा, ग्वालियर
रिती पाठक सिहावल, सिधी
ज्योती डेहरिया परासिया, छिंदवाडा
गंगाबाई उईके घोडाडोंगरी, बैतुल
नंदा ब्राम्हणे भीकनगांव, बैतुल
संगीता चारेल सैलाना, रतलाम
सरला रावत सबलगड
प्रियंका मीणा चौचाडा
ललिता यादव छत्तरपूर
अंचल सोनकर जबलपूर पूर्व (एससी)
निर्मला भूरिया पेटलावद (एसटी)

3 मंत्र्यांसह चार खासदारांना विधानसभेचे तिकीट

भाजपने 3 केंद्रीय मंत्र्यांसह 7 खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल आणि फगन सिंह कुलस्ते या तीन मंत्र्यांचा समावेश आहे. तर राकेश सिंह (जबलपूर पश्चिम), गणेश सिंह (सतना), रिती पाठक (सिहावल, सिधी), उदय प्रताप सिंह (गाडरवारा) यांचा समावेश आहे.