Chandrapur News : नाना पटोलेंच्या निषेधासाठी आले फक्त 8 जण! BJP च्या आंदोलनाचा उडाला फज्जा

लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांचा निषेध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत होते. आज भाजप महिला मोर्चाच्या वतीने शहर अध्यक्ष सविता कांबळे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार होते. पण या निषेध कार्यक्रमात उलटे चित्र बघायला मिळाले. या जाहीर निषेधाच्या आंदोलनात भाजपच्या केवळ पाच नगरसेविका आणि तीन महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. या पराभवाच्या धक्यातून भाजप कार्यकर्ते अद्यापही सावरलेले नाहीत, हे आजच्या निषेध आंदोलनातून दिसून आले. भाजपच्या कार्यकर्त्यांना नाना पटोले यांचा निषेध नकोसा होता की लोकसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात राज्यात पडसाद उमटले. याच दरम्यान पटोलेंचे पाय धुणारे कार्यकर्ते विनोद गुरव काही काळ नॉट रिचेबल झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. मात्र गुरव पुढे आलेत आणि “नाना पटोले माझे दैवत आहेत, एकदा नाही दहा वेळा मी त्यांचे पाय धुवेन”, असं ते म्हणालेत. गुरव यांच्या विधानाची चर्चा होत असतानाच चंद्रपुरात भाजपच्या महिला मोर्चाकडून पटोले यांचा जाहीर निषेध करण्याचा प्रयत्न झाला. पण यावेळी केवळ आठ महिला उपस्थित होत्या.

भाजपच्या महिला शहराध्यक्ष सविता कांबळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार होते. आंदोलनाला सविता कांबळे यांच्यासह शीला चव्हाण, शितल आत्राम, शितल गुरूनुले, कल्पना बगुलकर या चार माजी नगरसेविका उपस्थित होत्या. पटोले यांचा निषेध करणे भाजपच्या कार्यकर्त्यांना रुचले नाही, अशी खिल्ली आता उडवली जात आहे.