यूपीतील बहराइच दंगलीमागे भाजपचे नेते, पक्षाच्या आमदाराचीच तक्रार; गुन्हा दाखल

देवी विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान बहराइचमध्ये उसळलेली दंगल, दगडफेक आणि गोपाल मिश्रा या तरुणाच्या झालेल्या हत्येप्रकरणी भाजप आमदार सुरेश्वर सिंह यांनी आपल्याच पक्षाच्या 8 नेत्यांना जबाबदार धरले आहे. यूपीतील या जंगलराजप्रकरणी सिंह यांनी या सर्व नेत्यांवर गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे बहराइच हिंसाचार प्रकरणाला नवीन वळण लागले असून भाजपकडून दोन धर्मात कशाप्रकारे तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजली जाते याचे एक ज्वलंत उदाहरणच पुन्हा एकदा समोर आले आहे.

13 ऑक्टोबर रोजी बहराइच येथील महसी येथे देवी विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचार उसळला होता. मिरवणुकीदरम्यान काही लोकांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर एका समुदायाच्या लोकांनी दगडफेक आणि गोळीबार सुरू केला होता. या गोळीबारात गोपाल मिश्रा नावाच्या 22 वर्षीय तरुणाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर परिसरात हिंसाचार आणखी वाढला आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात मोठ्या संख्येने लोक जखमी झाले.

काय म्हणाले भाजप आमदार?

भाजपचे महसी येथील आमदार सुरेश्वर सिंह यांनी मोठा खुलासा केला. भाजपच्या नेत्यांनीच हिंसाचाराला खतपाणी घातले. त्यामुळे हिंसाचाराचे स्वरूप मोठे झाले. भाजप नेत्यांवर दंगल उसळवणे, दगडफेक आणि हत्येसारखे आरोप करत त्यांच्याविरोधात सुरेश्वर यांनी आपल्याच पक्षाच्या 8 नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, रामगोपाल मिश्राच्या हत्येनंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. तेव्हा आमच्यावरही दगडफेक आणि गोळीबार झाला. जमावाने माझ्या मुलालाही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही सुरेश्वर यांनी केला आहे.