अजित पवार गटाला गरज पडली आयात उमेदवाराची; धाराशीवमध्ये भावजय-दिरामध्ये लढत

माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा आणि भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच त्यांची धाराशीव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ओमराजे निंबाळकर उमेदवार आहेत. त्यामुळे अर्चना पाटील व ओमराजे निंबाळकर यांच्यात लढत होईल. हे दोन्ही उमेदवार नात्याने दीर आणि भावजय आहेत.

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला लोकसभेच्या पाच जागा आल्या आहेत. यापैकी रायगड, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केले आहेत. सुनील तटकरे यांनी आज प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन अर्चना पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होण्यापूर्वी त्यांनी तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर त्यांना लगेच लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. अर्चना पाटील पूर्वी भाजपमध्ये होत्या. यापूर्वी धाराशीव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या. धाराशीवसाठी राष्ट्रवादीला उमेदवार आयात करावा लागला आहे.

शरद पवारांऐवजी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरणार

सर्वोच्च न्यायालयाने घडय़ाळ या निवडणूक चिन्हाच्या वापराबाबत राष्ट्रवादीला फटकारले आहे. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ज्या सूचना केल्या आहेत त्याची माहिती कार्यकर्त्यांना दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पोस्टरवर शरद पवार यांच्याऐवजी यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र वापरणार असल्याचे त्यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.