बँकेला बुडवणारे भाजप आमदार रमेश जारकीहोली यांच्यावर गुन्हा दाखल

कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजपा आमदार रमेश जारकीहोली आणि अन्य दोघांवर सहकारी बँकेचे तब्बल 439.07 कोटींचे कर्ज न फेडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखाना उभारण्यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते.

चामराजपेट येथील कर्नाटक राज्य सहकारी बँकेचे महाप्रबंधक राजन्ना मुथाशेट्टी यांनी 420 कलमाखाली जारकीहोली यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जारकीहोली यांनी सौभाग्यलक्ष्मी शुगर लिमिटेड हा कारखाना बेळगावी येथे उभारण्यासाठी कर्ज घेतल्याची तक्रार शुक्रवारी दाखल करण्यात आली. जारकीहोली यांना 2013 आणि 2017 दरम्यान एकूण 232.88 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. मात्र, कर्जाची परतफेड न केल्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत व्याजाची थकबाकी तब्बल 439 कोटींवर पोहोचली. अशी तक्रार राजन्ना यांनी बंगळुरू पोलिसांत केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी जारकीहोली आणि अन्य तिघांवर बँकेची 439.07 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.