राज्यातील घटनाबाह्य मिंधे सरकारच्या शिफारशीवरून अजित पवार गटाचे इद्रिस नाईकवडी यांची राज्यपाल नामनिर्देशीत सदस्य म्हणून विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली आहे. सांगली-मिरज-कुपवाडा महापालिकेत नगरसेवक असताना पालिकेच्या महासभेत ‘वंदे मातरम्’ म्हणण्याला कडाडून विरोध करणारे इद्रिस नाईकवडी आता मिंधे आणि फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून विधिमंडळात बसणार आहेत.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी काही तास अगोदर विधिमंडळाचे नियम आणि कायदे धाब्यावर बसवून विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून सात सदस्यांना शपथ देण्यात आली. यामध्ये मिरजेतील इद्रिस नाईकवडी यांचा समावेश आहे. याच नाईकवडी यांनी नगरसेवक असताना वंदे मातरम्ला विरोध केला होता. सनातनच्या कार्यालयावरही हल्ला केला होता. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप असताना राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित सदस्य म्हणून कशी नियुक्ती करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हिंदुत्व आणि देशभक्तीच्या गप्पा मारणाऱया भाजप आणि मिंधे यांच्या भूमिकेचा पर्दाफाश झाला आहे.
हिंदुत्वाची भाषा करणारे गेले कुठे – संजय राऊत
सांगली महानगरपालिकेमध्ये वंदे मातरम् म्हणण्यास विरोध करणाऱया व्यक्तीला राज्यपाल नियुक्त आमदार करता? कुठे गेले हिंदुत्वाची भाषा करणारे देवेंद्र फडणवीस? असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त सदस्यांची पाठविलेली यादी राजभवनमध्ये प्रलंबित आहे, असे असताना दुसरी यादी घाईघाईत पाठविण्यात आली. महाविकास आघाडीने पाठविलेल्या यादीतील सदस्यांची राज्यपालांनी चौकशी केली होती. आता या 7 आमदारांची कोणती चौकशी करण्यात आली? हे सगळे राजकीय कार्यकर्ते आणि धर्मगुरू आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
– राज्यपाल नियुक्त आमदारांची मिंधे सरकारने शिफारस केली. राज्यपालांनी ही शिफारस लगेच मान्य केली आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी सात सदस्यांना शपथही देण्यात आली. या नियुक्त्या करताना संकेत आणि नियम पायदळी तुडवले गेले. यातील इद्रिस नाईकवडी यांच्या नियुक्तीवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हिंदुत्वाचा डंका पिटणाऱया भाजप आणि मिंधेंचा नकलीपणा यामुळे उघड झाला असून त्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.
इद्रिस नाईकवडी यांची वादग्रस्त पार्श्वभूमी़
इद्रिस नाईकवडी हे 2003 ते 2008 या काळात सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत नगरसेवक होते. पालिकेची महासभा वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने सुरू होते. ही परंपरा आहे. मात्र इद्रिस नाईकवडी यांनी वंदे मातरम् म्हणणार नाही. वंदे मातरम्वेळी उभा राहणार नाही, असा पवित्रा घेतला होता.
भाजपचे तत्कालीन नगरसेवक व सध्या भाजपचे प्रदेश संघटक मकरंद देशपांडे यांनी नाईकवडी यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली होती. शिवसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख विकास सूर्यवंशी यांनी मोठे आंदोलन केले होते.
मिरजेत सनातन संस्थेच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. तेव्हाही त्यात नाईकवडी होते. संभाजी भिडे गुरुजींविरोधातही त्यांनीआंदोलन केले होते. तसेच बाबरी मशीद पडल्यानंतर मिरजेत दगडफेक झाली होती. त्यातही नाईकवडी होते अशी चर्चा आहे.