भ्रष्ट मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यामुळे गोव्यात भाजप सरकार धोक्यात, स्वपक्षीयांचीच पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मोठय़ा प्रमाणात केलेल्या भ्रष्टाचारामुळे गोव्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार धोक्यात आले आहे. सावंत यांच्या भ्रष्ट कारनाम्यांची स्वपक्षीयांनीच दिल्लीतील पक्षश्रेष्ठाRकडे तक्रार केली आहे. सावंत यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून त्यामुळे सदस्य नोंदणी मोहीमेलाही अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही सावंत यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी तपास यंत्रणांकडे केली आहे.

प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री बनवल्यापासून गोव्यात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे भाजपच्या प्रतिमेला धक्का लागला असून पक्षाचे भवितव्यच धोक्यात आले असल्याचे भाजपच्या काही नेत्यांनी आणि आमदारांनी तक्रार केली आहे. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री पदावरून तातडीने बाजूला करावे असा आग्रह धरून गोव्यातील भाजपचा एक नेता दिल्लीतच तळ ठोकून बसला असल्याचे सांगण्यात येते.

मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री असताना गोव्यामध्ये पक्षाची प्रतिमा उंचावली होती, परंतु प्रमोद सावंत यांनी तिला डाग लावला असा भाजपच्याच आमदारांचा आरोप आहे. विरोधी पक्षनेते विजय सरदेसाई आणि अमित पालेकर यांनीही मुख्यमंत्री सावंत यांची धोरणे आणि योजनांवर टीका करतानाच त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्य आणि केंद्रीतील तपास यंत्रणांकडे केली आहे. सरदेसाई यांनी सावंत यांच्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखाच मांडला आहे.

प्रमोद सावंत यांच्यावरील आरोप

– 2022 पासून व्हीआयपींच्या वाहतुकीवर 4 कोटी 32 लाख रुपये, त्यांच्या पंचतारांकित वास्तव्यासाठी 1 कोटी 33 लाख रुपये, तर फक्त लाडू खरेदीसाठी 40 लाख रुपये मुख्यमंत्री सावंत यांनी उधळले.
– गोव्यामध्ये जमिनी बळकावण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडत आहेत. ते रोखण्यात प्रमोद सावंत यांचे सरकार अपयशी ठरले आहे. याप्रकरणी विशेष चौकशी पथक आणि निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करण्यासाठी समिती नेमली गेली, परंतु 93 पैकी फक्त 22 प्रकरणांमध्येच एफआयआर नोंदवता आला आहे.
– मुख्यमंत्री सावंत यांच्या आशीर्वादाने त्यांचे सहकारी मंत्री ऍटनासिओ मॉन्सेरेट यांनी 50 हजार कोटींचा जमीन घोटाळा केला.
– 1971 मध्ये गोव्यात जमिनीचा दर 25 पैसे प्रति चौरस मीटर होता. तो आता 1 लाख 19 हजार प्रति चौरस फूट इतका झाला आहे. यामागेही घोटाळा असल्याचा संशय आहे.
– मुख्यमंत्री सावंत यांनी एका महिलेला पोलिसात नोकरी मिळवून देतो असे सांगून तिच्याकडून लाच घेतली.
– गोव्यातील खाणप्रभावित क्षेत्राच्या विकासासाठी असलेला निधी सावंत यांनी त्यांच्या मालकीच्या साई नर्सिंग होमकडे वळवला.