पराभवानंतर भाजप नेत्यांमध्ये जुंपली; अखेर चिखलीकरांना करावा लागला हस्तक्षेप

नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर भाजपतील अंतर्गत आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण चांगलेच रंगले आहे. हॉटेल ताज पाटील येथे झालेल्या नांदेड उत्तर-दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आभार सभेत महानगरप्रमुख दिलीप कंदकुर्ते भाषण करण्यासाठी उठल्यानंतर विधानसभा प्रमुख बालाजी पाटील पुणेगावकर यांच्यात खडाजंगी झाली. पंधरा मिनिटे त्यांच्यात वाद सुरू होता. या दोन नेत्यांमध्य चांगलीच जुंपली होती. अखेर चिखलीकरांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर वाद थांबला.

नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात आभार बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. प्रचार यंत्रणेत अनेकांनी काम केले नाहीत, अनेक पदाधिकारी फक्त मिरवण्यासाठी येत होते. बिलोली, देगलूर, मुखेड, नायगाव, उमरी, भोकर, धर्माबाद, मुदखेड, अर्धापूर आदी ठिकाणी झालेल्या आभार सभेत कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर चिखलीकरांनी बिलोली येथील सभेत ज्यांनी इमानदारीने काम केले, त्यांच्यासोबत राहण्याचा व ज्यांनी बेईमानी केली त्यांचा समाचार घेणार असे वक्तव्य केले होते. त्यानंतर वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घेत त्यांची कानउघाडणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेत माझ्या पराभवात कोणाचाही दोष नाही, मला कुणावरही आरोप करायचे नाहीत, असे स्पष्ट करत युटर्न घेतला.

तीन दिवस लांबलेली नांदेड दक्षिण व उत्तरची आभार सभा सोमवारी रात्री हॉटेल ताज पाटीलमध्ये आयोजित करण्यात आली. सुरुवातीलाच प्रास्ताविक करताना महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते हे भाषणासाठी उठल्यानंतर विधानसभा प्रमुख बालाजी पाटील पुणेगावकर यांनी जोरदार शब्दात कंदकुर्तेंना जाब विचारला. निवडणुकीच्या काळात नांदेड दक्षिण व उत्तरमध्ये तुम्ही कुठे होतात, उमेदवार निवडीसाठी आपण काय प्रयत्न केले, प्रचार यंत्रणा कुठे राबवली, तुम्हाला या मेळाव्यात बोलण्याचा अधिकार नाही, असे सांगत त्यांना धारेवर धरले. त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. काही कार्यकर्त्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी चिखलीकर सर्व प्रकार स्टेजवर बसून शांतपणे पाहत होते. तरीही हा गोंधळ थांबत नव्हता.

पुणेगावकर यांच्यासोबत आणखी दोन-तीन कार्यकर्त्यांनी उठून कंदकुर्तेच्या भाषणात व्यत्यय आणला. त्यामुळे गोंधळात भर पडली. या दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती कोणाही माघार घेण्यास तयार नव्हते. या वादावादीने भाजपतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. वाद थांबण्याची चिन्हे नसल्याने अखेर चिखलीकर यांनी हस्तक्षेप करत बालाजी पाटील पुणेगावकर यांना त्यांच्याजवळ जात समजावले आणि त्यांना बसण्यास सांगितले. त्यानंतर गोंधळ कमी झाला. या वादावादीनंतर कुणाचेही भाषणे झाली नाहीत. स्वतः चिखलीकरांनी भाषण करत निवडणुकीच्या काळात मला सहकार्य करणार्‍यांचे मी आभार मानतो, असे म्हणून भाषण आटोपते घेतले.

या घटनेमुळे भाजपच्या आभार बैठकीपेक्षा हा वादावादीचा विषय चर्चेचा ठरला आहे. याची राजकीय वर्तुळात चर्चा असून पराभवानंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. तसेच या वादावादीत चिखलीकर यांना हस्तक्षेप करावा लागला, याचीही चर्चा होत आहे.