पश्चिम बंगालच्या संदेशखळी प्रकरणात एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात भाजप नेत्यांनी पैसे वाटल्याचा दावा करण्यात आला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या व्हिडीओत भाजपच्या बुथ प्रमुखाने शहाजहां शेख यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पैसे वाटल्याचा दावा करण्यात आला आहे.
या 45 मिनिटांच्या व्हिडीओत भाजप नेता गंगाधर कायल याने म्हटलं आहे की, आम्ही 50 बुथसाठी 2.5 लाख रुपयांची गरज पडेल. या प्रत्येक बुथवर 30 टक्के महिला आंदोलक आहेत. त्यामुळे येथील एससी, एसटी आणि ओबीसी समुदायातील लोकांना पैसे देऊन खुश ठेवावं लागेल. महिला पुढच्या रांगेत राहून पोलिसांना विरोध करतील, असं या व्हिडीओत कायल म्हणताना दिसतो.
हा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओच्या सत्यतेबाबत अद्याप कोणताही खुलासा होऊ शकलेला नाही. या खेरीज 10 मे रोजी देखील संदेशखळी प्रकरणातील एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात तिने भाजपच्या लोकांनी तिच्याकडून कोऱ्या कागदावर सही घेतली होती. त्याचा वापर करून बलात्काराची खोटी तक्रार करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला होता.
10 मे रोजीच्या व्हिडीओत सदर महिलेने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा आणि भाजप नेत्या पियाली दास यांच्यावर थेट आरोप केले होते. त्यानंतर संदेशखळी प्रकरणात बलात्काराच्या खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.