मोदींच्या आशीर्वादाने बिहारमध्ये नवीकोरी घराणेशाही; राजकीय पार्श्वभूमी असलेल्या 11 जणांना उमेदवारी

लालूप्रसाद यादव यांच्यासह देशभरातील राजकीय कुटुंबातून आलेल्या नव्या पिढीवर घराणेशाहीचा आरोप करत राळ उठवणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याने बिहारमध्ये नवीकोरी घराणेशाही सुरू होणार आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एनडीएतील घटक पक्षांतील सात जणांना आणि भाजपमधील चार जणांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बिहारमध्ये नव्या घराणेशाहीचा उदय होणार आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने बिहारमधील सर्व 40 लोकसभेच्या जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. या लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील राजकीय कुटुंबातील 11 सदस्यांना उमेदवारी दिली आहे. त्यातील चार उमेदवार भाजपचे आहेत. मधुबनीचे विद्यमान खासदार हुकूमदेव नारायण यादव यांचा मुलगा अशोक यादव यांना वडिलांच्या जागेवरच उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार मदन जैस्वाल यांचे पुत्र भाजपचे माजी राज्यप्रमुख संजय जयस्वाल यांना पश्चिम चंपारण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार राम नरेश सिंह यांचे पुत्र सुशीलकुमार सिंह यांना औरंगाबादमधून उमेदवारी देण्यात आली आहे. आणि माजी खासदार सी. पी. ठाकूर यांचा मुलगा विवेक ठाकूर यांना नवादामधून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे.

जेडी (यू) च्या यादीत माजी मंत्री वैद्यनाथ महतो यांचा मुलगा सुनील कुमार यांना वाल्मीकी नगरमधून, माजी खासदार आनंद मोहन यांच्या पत्नी लवली आनंद यांना शिवहरमधून आणि माजी आमदार रमेश कुशवाह यांची पत्नी विजयलक्ष्मी देवी यांना सिवानमधून उमेदवारी देण्यात आली आहे. लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) या यादीत पहिल्या स्थानावर आहे. लोक जनशक्तीचे पाच उमेदवार राजकीय कुटुंबातील आहेत. पक्षाचे नेतृत्व चिराग पासवान यांच्याकडे आहे, ते त्यांच्या वडिलांचा बालेकिल्ला हाजीपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. त्यांचे मेहुणे अरुण भारती हे जमुईमधून निवडणूक लढवणार आहेत.

बिहारचे माजी मंत्री अशोक कुमार चौधरी यांची कन्या आणि माजी काँग्रेस मंत्री महावीर चौधरी यांची नात संभवी चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर जेडी (यू) आमदार दिनेश सिंह यांच्या पत्नी वीणा देवी या वैशालीमधून निवडणूक लढवणार आहेत. आरजेडी उमेदवार माजी खासदार राजेश कुमार यांचा मुलगा कुमार सर्वजीत यांच्या नावाचादेखील यात समावेश आहे, तर ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे पुत्र शंतनू बुंदेला यांना मधेपुरामधून उमेदवारी दिली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले आहे.

आता पंतप्रधानांनी यावर बोलावे!
– मृत्युंजय तिवारी
लालूप्रसाद यांनी स्पष्टच सांगितले आहे की, जेव्हा वकिलाची मुले वकील होऊ शकतात, तेव्हा राजकारण्यांची मुलेदेखील राजकारणाची निवड करू शकतात. एनडीएकडून 11 घराणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही घराणेशाही नाही का, यावर पंतप्रधानांनी बोलावे, असा टोला आरजेडी नेते आणि प्रवत्ते मृत्युंजय तिवारी यांनी लगावला.