भाजपने डॉग स्क्वॉड बाळगलेय! जयंत पाटील यांनी डागली तोफ

भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून महाविकास आघाडीने खोतांचा कडक शब्दांत समाचार घेतला. भाजपने डॉग स्क्वॉड बाळगले आहे, याचे प्रायश्चित्त घ्यावे लागणार, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज तोफ डागली.

सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा जयंत पाटील यांनी सांगलीत बोलताना चांगलाच समाचार घेतला. ही घटना दुर्दैवी आहे. अशी माणसे भाजपने बाळगली आहेत. या प्रकाराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन आहे.

का? त्याचा खुलासा फडणवीसांनी करावा. भाजपमधील काही लोक शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करतात आणि आमदारकी मिळवत असतील तर त्यांना लखलाभ. सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रातील जनता भाजपला प्रायश्चित घेण्यास भाग पडेल असा इशारा जयंत पाटील यांनी दिला. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत नागपूर विमानतळावर माध्यम प्रतिनिधींनी शरद पवार यांच्याकडे विचारणा केली असता, शरद पवार यांनी कोणतेही भाष्य न करता यावर बोलणे टाळले.