देवाभाऊ म्हणतात, मला मोकळं करा ! मतदारांनी 19 जागी आपटल्यावर आता जमिनीवर आले

केंद्रातील सत्तेच्या जोरावर हम करेसो कायदा अशा अर्विभावात असणाऱया भाजपला लोकसभा निवडणुकीत जनतेने दणका दिला आहे. सत्तेसाठी फोडाफोडीचे राजकारण करूनही महाराष्ट्रात 19 ठिकाणी आपटल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर जमिनीवर आले आहेत. राजकीय तसेच वेळप्रसंगी पक्षांतर्गत विरोधकांना नामोहरम करण्यासाठी विविध कुरापती करून झाल्यावर या सरकारमधून मला मोकळे करा अशी विनवणी आता देवाभाऊ करू लागले आहेत. केंद्रीय नेतृत्वाला तशी विनंती करणार असल्याचे फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसभा निवडणुकीत भाजपची महाराष्ट्रात पीछेहाट झाली. अपेक्षेइतक्याही जागा भाजपच्या पदरात पडल्या नाहीत. या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी भाजपच्या नेत्यांची बुधवारी प्रदेश कार्यालयात बैठक झाली. त्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी भाजपला मिळालेल्या मतांची आकडेवारी सांगत पराभवाबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. नंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारत आता विधासभेच्या निवडणुकीत पूर्णवेळ उतरण्यासाठी मला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

‘त्या’ पोस्टचा रोख कोणाकडे?

पराभवानंतर महाराष्ट्र भाजपात धुसफूस सुरू झाली आहे. महाराष्ट्र आणि मुंबई प्रदेश भाजपाला वस्तुस्थिती तपासावी लागेल. या पराभवाची जबाबदारी कोण घेणार? एक आदमी की लाइन छोटी करने के चक्कर में पार्टी का नुकसान किया… महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार का, अशी एक्स पोस्ट मोहित पंबोज यांनी केली आहे.

शेतकऱ्यांचा रोष, अल्पसंख्याक व मराठा आरक्षणामुळे पराभव

अॅन्टी इन्कम्बन्सीबरोबरच कांदा, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱयांचा रोष, अल्पसंख्याक आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा यामुळे भाजपचा पराभव झाला अशी कारणेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केली. अल्पसंख्याक आणि काही भागांत मराठा आरक्षणाचा मुद्दा होता. सरकारने आरक्षण दिल्यावरदेखील त्या ठिकाणी एक प्रचार झाला. त्याला आम्ही प्रभावीपणे उत्तर देऊ शकलो नाही. त्याचा फटका आम्हाला खास करून मराठवाडय़ात बसला असे फडणवीस म्हणाले. शेवटी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे न देता त्यांनी काढता पाय घेतला.

मुंबईत जास्त मते मिळवूनही पडलो

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची कारणे स्पष्ट करताना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मतदानाची आकडेवारी व टक्केवारी मांडत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मतांची तुलना केली. मुंबईतील निकालांबद्दल बोलताना ते म्हणाले की, मुंबईत महाविकास आघाडीला चार आणि महायुतीला दोन जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला मुंबईत 24 लाख 62 हजार तर महायुतीला 26 लाख 67 हजार मते आहेत. मुंबईत महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला दोन लाख मते अधिक मिळाली.

बावनकुळे म्हणतात, फडणवीस हनुमान!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर आज देवेंद्र फडणवीस यांची हनुमानाशी तुलना केली. हनुमंतरायामध्ये खूप क्षमता होती पण हनुमंतरायांना कधी कधी त्याची आठवण करून द्यावी लागायची. तुम्ही लंकेला पार करून, लंका जाळून वापस येऊ शकता हे त्यांना सांगावे लागायचे. तसेच देवेंद्रजींबद्दल आहे. त्यांना आम्ही तेच सांगतोय. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढा असा आमचा त्यांना सल्ला आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.