भाजपच्या उमेदवारांना नकोयत मोदींच्या सभा, लोकसभेच्या अनुभवावरून उमेदवार धास्तावले?

लोकसभा निवडणुकीत भाजप एनडीएला महाराष्ट्रात सर्वात मोठा दणका बसला. त्या निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 23 जागांवर सभा झाल्या. त्य़ातील 18 जागांवर महायुतीचे उमेदवार पराभूत झाले आहेत. तर केवळ 5 उमेदवार विजयी झाले. त्यामुळे देशात मोदींचा जलवा आता उरलेला नसल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान विधानसभा निवडणूकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणार आहेत. मात्र भाजपच्या अनेक उमेदवारांनी मोदींची सभा नको असा पवित्रा घेतल्याचे समजते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. कोणाला त्यांच्या मतदारसंघात सभा हव्या आहेत, याबाबत प्रदेश कार्यालयाकडून विचारणा करण्यात आली. मात्र अनेक उमेदवारांनी मोदींच्या सभांना स्पष्ट् नकार कळविल्याचे समजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. तयारीसाठी मोठा काळ त्यात वाया जातो. त्यामुळे अनेक उमेदवारांनी मोदींच्या सभा नको असे कळविले आहे. लोकसत्ता ऑनलाईनने याबाबत बातमी दिली आहे.

दरम्यान मोदींच्या सभांचा लोकसभेतील अनुभव पाहता उमेदवारांनी धास्ती घेतल्याचे देखील बोलले जात आहे. लोकसभेत शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष फोडून, तपास यंत्रणा मागे लावून आणि पंतप्रधान मोदींच्या 23 सभा होऊनही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात महायुतीच्या 23 उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. यापैकी 18 जागांवर महायुतीचे उमेदवार पराभूत झाले आहेत.