भाजपने अजित पवारांवर 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करत त्यांना ब्लॅकमेल केले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडण्यासाठीच भाजपने या आरोपांचा वापर केला, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांनी हे आरोप केले आहेत. जयंत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस ज्यावेळी विरोधात होते. तेव्हा त्यांनी अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे गंभीर आरोप केले. फडणवीस जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी आर. आर. पाटील यांच्यावर आरोप करून अजित पवार यांना फाईल दाखवली. याचा अर्थ या आरोपांचा वापर आमचा पक्ष फोडण्यासाठी केला गेला. त्यानंतर या फाईल्स दाखवून अजित पवारांना 10 वर्ष ब्लॅकमेल केले. म्हणून अजित पवार भाजपसोबत गेले असे दिसत आहे, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. अजित पवारांनी स्वतःला महायुतीतून दूर केले असे जयंत पाटील म्हणाले. पण अजित पवारांनी आर आर पाटील यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. या विधानामुळे भाजप पक्ष उघडा पडला आहे. भाजप नेत्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. तसेच गेल्या 10 वर्षांत फडणवीस आणि अजित पवार यांचे संबंध कसे आहेत हेही यानिमित्ताने समोर आले, असेही जयंत पाटील म्हणाले.
महायुतीच्या प्रचारातून अजित पवार गायब
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार महायुतीकडून केला जात आहे. परंतु, महायुतीच्या प्रचारामधून अजित पवार गायब आहेत. तसेच महायुतीच्या प्रचाराच्या जाहिरातींमधूनही अजित पवार यांचे फोटो दिसत नाहीत. हे फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात चित्र दिसत आहे. महायुतीच्या पोस्टरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चेहरे आहेत. महायुतीच्या प्रचाराच्या अनेक जाहिराती मराठी वाहिन्यांवर चालवल्या जात आहेत. या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अजित पवार यांचा फोटोच लावलेला नाही. अजित पवार यांनी नवाब मलिक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यापासून फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील दुरावा वाढला आहे.