शिवरायांचा अवमान करणाऱ्या मिंधे आणि भाजपच्या विषारी सापाला चेचायलाच हवं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे घाईघाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आरोप होत होते. मात्र त्याकडे मिंधे सरकारने दुर्लक्ष केले होते. या पुतळ्याला वर्ष होण्याआधीच सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा कोसळला आहे. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.या घटनेबाबत शिवप्रेमी आणि विरोधकांनी मिंधे सरकार आणि भाजपवर हल्ला चढवला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनीही ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत मिंधे सरकार आणि भाजपवर हल्ला चढवला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा मिंधे आणि भआजपने फक्त स्वार्थी राजकारणासाठी वापर केला आहे. आमचं आणि साऱ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईत बनवलेलं आणि मोदीजींच्या हस्ते उद्धाटन झालेलं छत्रपती शिवरायांचं मालवण इथलं स्मारक आज केवळ 8 महिन्यातच कोसळलं. मिंधे सरकारची कंत्राटदार धार्जिणी राजवट ह्याला कारणीभूत आहेच, पण त्याहूनही घातक अशी भाजपाची मानसिकता कारणीभूत आहे. आम्ही काहीही करु आणि त्यातून बिनधास्त सुटू असा अहंकार त्यांच्यात आहे, असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

भाजपने याच अहंकारापोटी महाराजांच्या स्मारकाचं गांभीर्य लक्षात न घेता घाईत ते बनवण्यात आलं. केवळ महाराजांच्या प्रतिमेचा वापर करण्याचा हेतू होता, त्यामुळे त्या स्मारकाच्या गुणवत्तेकडे लक्षच दिलं गेलं नाही. स्थानिकांचं म्हणणंही ऐकलं नाही. आज जेव्हा आमच्या महाराजांचा पुतळा पडलेला पाहिला तेव्हा मनाला प्रचंड यातना झाल्या. महाराजांचा असा अपमान करणाऱ्या मिंधे राजवटीला आणि भाजपा नावाच्या विषारी सापाला आता चेचायलाच हवं! महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक प्रतिमेला सांभाळायला हवं, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले.

कोकणात मालवणमध्ये पंतप्रधानांनी 4 डिसेंबर रोजी अनावरण केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. पंतप्रधानांना जेव्हा तुम्ही अनावरण करण्यासाठी तेव्हा एवढीही काळजी घेत नाही यात भ्रष्टाचार व्हायला नको. याची चौकशी झालीच पाहिजे आणि दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, असेही आदित्य ठाकरे यांनी ठणाकावले.