Kolkata Violence : ‘वाम आणि राम मिळून करताहेत हल्ले’; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. अशातच मध्यरात्री आंदोलकांवर हल्ला करण्यात आला तसेच हॉस्पिटलमध्येही तोडफोड करण्यात आली. या हिंसक घटनेवरून आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप केला आहे. भाजप आणि डावे पक्ष मिळून हल्ले करताहेत, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप केला आहे.

आरजी कर हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोडीला विद्यार्थांना जबाबदार धरणार नाही. वाम आणि राम एकत्रित येऊन हे सर्व करत आहेत. काही राजकीय पक्ष पश्चिम बंगालमध्ये आशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. घटना वेदनादायी आणि विचलित करणारी आहे. सीबीआयला संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तपास सुरू आहे. कधी-कधी अशा घटना होतात. उन्नावमध्येही घडली होती. पोलीस तपास करत आहे. कोर्टाच्या आदेशावरही आमचा आक्षेप नाही. हे विद्यार्थ्यांचे आंदोलन नसून समाजकंटकांचे कृत्य आहे. पोलिसांवरही काल हल्ला झाला होता, असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.

आरजी करमध्ये काल जो काही तांडव करण्यात आला त्यात आरजी करचे विद्यार्थी नव्हते. ते बाहेरचे लोक होते. जे व्हिडिओ समोर आले आहेत त्यात काहींच्या हातात राष्ट्रध्वज आहे. ते भाजपचे लोक आहेत. तर काहींच्या हातात सफेद लाल झेंडे आहेत. काल पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. तरीही पोलिसांनी संयम राखला. आता हे प्रकरण आमच्या हातात नाही. जे काही विचारायचं असेल ते CBI ला विचारा, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.