पुण्यात पुन्हा हिट अ‍ॅण्ड रन, परदेशी महिला चालवत होती रिक्षा, बाईकला धडक लागून एकाचा मृत्यू

पुण्यात पुन्हा एक हिट अ‍ॅण्ड रनची घटना घडली आहे. एक परदेशी महिला वेगात रिक्षा चालवत होती. तेव्हा ओव्हरटेक करण्याच्या नादात या महिलेने एका बाईकला धडक दिली. या धडकेत बाईक चालक गंभीर जखमी झाला. पण जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी या महिलेने तिथून धूम ठोकली.

मिळालेल्या माहितीनुसार जुन्नर शहरात ५५ वर्षीय बाळासाहेब डेरे बाईकवरून मित्र संजय जाधवसोबत जात होते. त्याच मार्गावर एक परदेशी पर्यटक महिला रिक्षा चालवत होती. या महिलेने डेरे यांच्या बाईकला ओव्हरटे करण्याचा प्रयत्न केला. त्याच नादात डेरे यांच्या बाईकला धडक लागली. ही धडक इतकी जोरात होती की डेरे यांची बाईक पडली आणि दोघेही जखमी झाले. पण या दोघांना मदत करण्याऐवजी ही महिला तिथून पळून गेली. ही महिला नाशिकच्या दिशेने पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात डेरे यांचा मृत्यू झाला आहे तर जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे आणि तिला नारायणगाव पोलिस स्थानकात हजर करणार आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.