राम नाम सत्य…, तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या सरकारवर साधला निशाणा

बिहारमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. तेजस्वी यादव यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर गुन्ह्यांची यादी जाहीर केली. गुन्हेगारांना अभय देऊन बिहार सरकारने कायदा-सुव्यवस्थेचे ‘राम नाम सत्य’ केल्याचा हल्लाबोल केला आहे.

तेजस्वी यादव सध्या दुबईमध्ये आपल्या कुटुंबासोबत आहेत. त्यांनी बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारवर निशाणा साधला आहे. सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर त्यांनी त्यांनी गुरुवारी सरकारवर पुन्हा निशाणा साधला. राम नाम सत्य, सुशासन का तथ्य, अपराधियों को अर्घ्य!… अशी टीका त्यांनी केली आहे.

त्यांनी एक्स हँडलवर गुन्हेगारीची 143 घटनांची यादी शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीले की, गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. गुन्हेगारांना अभय देऊन बिहार सरकारने कायदा सुव्यवस्थेचे ‘राम नाम सत्य’ केले आहे.  सोबत त्यांनी मुजफ्फरपूर, मुंगेर, बेगूसराय, पटनासह अन्य जिल्ह्यांमधील गुन्हेगारीच्या घटनांची यादी जारी केली आहे. आता बोलू नका की बिहारमध्ये जंगलराज नाही तर सर्वनाश होईल, असे तेजस्वी यादव पुढे म्हणाले.