Bihar Political Crisis – भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये नव्या सरकारच्या शपथविधीची तयारी सुरू आहे. नितीश कुमार यांनी राजदसोबतची आघाडी तोडून पुन्हा भाजपसोबत एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी राजभवन येथे होणार असून नितीश कुमार नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत भाजपचे सम्राट चौधरी (Samrat Chaudhary) आणि विजय सिन्हा (Vijay Sinha) हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सम्राट चौधरी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी, तर विजय कुमार सिन्हा यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर भाजपचे सर्व आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार असून तिथून बसद्वारे राजभवानाकडे मार्गस्थ होतील.

मल्लिकार्जुन खरगेंची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, नितीश कुमारांच्या राजीनाम्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात माझी तेजस्वी यादव यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी आपण याविरोधात एकजुटीने लढू असे म्हटले. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना इंडिया आघाडीत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला. परंतु आम्हाला ज्याची भीती होती तेच झाले. देशात असे आयाराम-गयाराम अनेक आहेत, असा टोला खरगे यांनी नितीश कुमार यांना लगावला.

ठग आणि लोभी लोकांची युती

दरम्यान, राजद नेते एजाज अहमद यांनी नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तरुणांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या तेजस्वी यादव यांचा नितीश कुमार यांनी विश्वासघात केल्याचे ते म्हणाले. आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊन तुमचे अस्तित्व आणि पक्ष वाचवला. पण स्वार्थापोटी राजीनामा देऊन तुम्ही तेजस्वी यादव यांच्या विचारसरणीला धक्का दिला आहे. आज ठग आणि लोभी लोकांची युती होत आहे, असा टोलाही एजाज अहमद यांनी जदयू-भाजप युतीवर लगावला.