YouTube पाहून पोटाची शस्त्रक्रिया, बोगस डॉक्टरचे नको ते धाडस जीवावर बेतले

बिहारमध्ये भयंकर घटना उघडकीस आली आहे. चक्क यूट्युब पाहून एका डॉक्टरने रुग्णाची पोटाची शस्त्रक्रिया केली. बोगस डॉक्टरचे हे नको ते धाडस 15 वर्षाच्या मुलाच्या जीवावर बेतले आहे. या शस्त्रक्रियेनंतर मुलाचा मृत्यू झाला. यानंतर शस्त्रक्रिया करणारा बोगस डॉक्टर फरार झाला आहे.

बिहारमधील सारण जिल्ह्यातील 15 वर्षीय किशोरला शुक्रवारी रात्री उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला मधुरा येथील डॉ. अजितकुमार पुरी याच्या दवाखान्यात नेले. यानंतर अजितकुमारने कुटुंबीयांची परवानगी ने घेताच मोबाईलवर यूट्युबवर पाहून किशोरची शस्त्रक्रिया करण्यास सुरू केल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.

शस्त्रक्रियेदरम्यान किशोर प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी विरोध करताच डॉक्टरने त्यांना दमदाटी केली. अखेर डॉक्टरने मुलाला पाटणा येथील रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुलाला रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर डॉक्टरने मृतदेह सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

यानंतर कुटुंबीयांनी पुरी याच्यावर निष्काळजीपणा आणि गैरवर्तनाचा आरोप करत स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी बोगस डॉक्टर आणि त्याच्या क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. किशोरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.