‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादवला अटक;

 रेव्ह पार्टीत सापाच्या विषाचा पुरवठा केल्याच्या आरोपाखाली नोएडा पोलिसांनी ‘बिग बॉस ओटीटी 2’ चा विजेता आणि लोकप्रिय युटय़ूबर एल्विश यादवला अटक केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एल्विशवर रेव्ह पार्टीत नशेसाठी सापाचे विष पुरवल्याचा गंभीर आरोपाखाली नोएडा सेक्टर-49 च्या पोलीस ठाण्यात एल्विशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती.

याप्रकरणी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून अहवाल मागवण्यात आला. या अहवालातून रेव्ह पार्टीच्या नमुन्यांमध्ये सापाचे विष असल्याचे उघड झाले. त्यामुळे एल्विशवर कारवाईची टांगती तलवार होती. याप्रकरणी एल्विशला आज चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तासाभराच्या चौकशीनंतर एल्विशला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, रेव्ह पार्टीमध्ये मी कुठे होतो हे पोलिसांनी सांगितले नाही. मुळात मी पोलिसांना सापडलोच नाही. त्यामुळे सिद्ध करून दाखवा की मी तिथे होतो आणि ती माझी रेव्ह पार्टी होती. जर हे सिद्ध झाले तर मी नग्न होऊन नाचेन, असे आव्हान एल्विशने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओतून पोलिसांना दिले होते.