सासरा ते मिरेगावला जोडणाऱ्या नव्या पुलावर मोठा खड्डा; कंत्राटदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह

सासरा ते मिरेगावला जोडणाऱ्या 2 किमीच्या नव्या पुलावर मोठा खड्डा पडला आहे. या पुलाचे काम नुकतेच करण्यात आले होते. अवघ्या दोन महिन्यात पुलावर भगदाड पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थीत केलं जात आहे. या पुलाचे काम सुरू असताना निकृष्ट काम होत असल्याचे दिसून येत होते. मात्र, बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता पुलावर मोठा खड्डा पडला आहे.

सरकारच्या धोरणानुसार प्रत्येक गाव एक दुसऱ्याशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना राबवण्यात येते. या योजनेतून नवनवीन रस्ते, पूल निर्मिती करण्यात येत आहे. मात्र, यातील अनेक कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी साकोली तालुक्याला जोडण्यासाठी मिरेगाव ते सासरा येथील नदीवर कोट्यवधी रूपये खर्च करुन नवीन पल बांधण्यात आला. दोन महिन्यांपूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. मात्र अवघ्या दोन महिन्यात पुलावर भगदाड पडल्याने पुलाच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थीत होत आहे. पुलाते बांधकाम सुरू असताना निकृष्ट काम होत असल्याच्या तक्रारीकडे सार्वजानिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले होते. कामातील निकृष्टतेबाबत कामात सुधारणा करु, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, बांधकाम पुर्ण होताच अवघ्या दोन महिन्यात पुलावर भगदाड पडले आहेत. त्यामुळे पुलाचे काम निकृष्ट झाल्याचे दिसून येत आहे. अशा निकृष्ट कामे करणारे कंत्राटदारावर व कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.