साई मिडासवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मोठी कारवाई, तात्काळ बांधकाम थांबवण्याचे आदेश

झोपडी कॅन्टीन परिसरात दूध संघाच्या जागेवरील साई मिडासची निर्माणाधीन टोलेजंग इमारत वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वादग्रस्त इमारतीचे बांधकाम तात्काळ बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. इमारतीची परवानगी न घेतल्याने हे काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नगरमधील अनधिकृत बांधकामावरील ही मोठी कारवाई मानली जाते. या कारवाईनंतर नगरमधील लँड माफिया आणि बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

काँग्रेस नेते दीपक चव्हाण आणि शहर सहकारी बँकेचे विश्वस्त संजय घुले यांनी जेष्ठ विधीज्ञ अभिजीत पुप्पाल यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत तक्रार केली होती.

दोन लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त बांधकाम असेल तर हरित आयोग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची रितसर परवानगी घ्यावी लागते. मात्र साई मिडासच्या बांधकामासाठी परवानगी घेतली नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या प्रकल्पाला भेट देण्यासाठी आले होते. अधिकाऱ्यांना पाहणीदरम्यान त्रुटी आढळून आल्याने त्यांनी ही कारवाई केली आहे.

मंडळाने मनपा आयुक्त यांना थेट आदेश काढून ‘साईमिडास ऑरम बिझनेस हब अँड ओ आर ओ रेसिडन्स’ या इमारतीवर तात्काळ कारवाई करा. बांधकाम तात्काळ थांबवा, असा थेट आदेश दिला आहे.