सुनावणीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना येथील भूमी अभिलेख कार्यालयातील जिल्हा अधीक्षक सुदाम दादाराव जाधव (वय 50, रा. पुण्यप्रवाह सोसायटी, नागाळा पार्क, कोल्हापूर) आणि वाहनचालक उदय लगमाना शेळके (वय 40, रा. कणेरीवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या दोघांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीची मालकी ही नजरचुकीने चुलत्यांच्या नावे लागली होती. ती दुरुस्त करून संबंधित नावे लावण्यासाठी उपसंचालक भूमी अभिलेख, पुणे या प्रादेशिक कार्यालयाकडे 2018 मध्ये अर्ज केला होता. उपसंचालकांच्या आदेशाने या अर्जाची सुनावणी येथील भूमी अभिलेख अधीक्षक यांच्या समोर सुरू झाली होती. या सुनावणीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी चालक उदय शेळके याने स्वतःसाठी पाच हजार आणि सुदाम जाधव यांच्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच यासंदर्भात सुदाम जाधव यांनी तक्रारदाराकडे चालक शेळके यांनी मागणी केल्याप्रमाणे पैसे दिले का अशी विचारणा करत, या लाच मागणीस संमती दिली. त्यानंतर तक्रारदाराकडून सुदाम जाधव यांनी दहा हजार व चालक शेळके याला पाच हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले. या दोघांच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.