भिवंडीतील चिमुकल्याला शेजाऱ्याने मुंबईत विकले, सीसीटीव्ही फुटेजमुळे बिंग फुटले

अवघ्या 60 हजार रुपयांसाठी साडेतीन वर्षांच्या मुलाची शेजाऱ्यानेच मुंबईत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीत उघडकीस आला. या भयंकर प्रकाराचे बिंग सीसीटीव्हीमुळे फुटले असून शांतीनगर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या सहाय्याने बारा तासातच मुलाचा शोध घेत तिघांना अटक केली आहे.

भिवंडीतील शांतीनगर परिसरात असलेल्या रामनगर येथे एका साडेतीन वर्षांच्या मुलाचे 17 नोव्हेंबर रोजी अपहरण झाले. मुलगा हरवल्याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत दंग असतानादेखील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या सहाय्याने मुलाची शोधमोहीम सुरू केली. घराशेजारी खेळत असताना आरोपी मोहम्मद शाह याने हॉटेलमध्ये खाऊ खाण्याच्या बहाण्याने मुलाला घेऊन गेला. त्यानंतर मुलाला कुर्ला येथील मोहम्मद शाह व त्याचा साथीदार समसुद्दीन शाह यांना विकले असल्याचे समोर आले. याप्रकरणी शेजारी राहणाऱ्या मोहम्मद शाह (53), रफिक शाह (39) व समसुद्दीन शाह (45) यांना अटक करण्यात आली आहे.

मूल होत नसल्याने अपहरण

कुर्ला येथील मोहम्मद शाह याला बारा वर्षांपासून मूल होत नसल्याने अपहरण केलेल्या मुलाला विक्री केल्याची कबुली आरोपींनी दिली. शहरात लहान मुलांबाबत निष्काळजीपणा होत असून पालकांनी एकटे सोडू नये, त्यांच्यावर लक्ष द्यावे असे आवाहन शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी नागरिकांना केले आहे.