भावना गवळी यांच्या संस्थेचे खाते गोठवले; 8 कोटींची करचोरी, आयकर विभागाची कारवाई

मिंधे गटाच्या यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्या ‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठान’ या संस्थेचे बँक खाते आयकर विभागाने गोठवले आहे. 8 कोटी 26 लाखांचा कर चुकवल्या प्रकरणी आयकर विभागाने कलम 226(3) अंतर्गत ही कारवाई केली असून प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि संचालकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

आयकर विभागाने गेल्या आठवडय़ात खासदार भावना गवळी यांना नोटीस बजावली होती. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेने 2013 ते 2016मध्ये आयकर चुकवल्याचा आरोप यात करण्यात आला होता. नोटिशीला उत्तर देताना खासदार गवळींनी दोन दिवसांपूर्वी अकोल्यातील आयकर कार्यालयात सीएच्या माध्यमातून कागदपत्रे सादर केली होती. मात्र आयकर विभागाचे समाधान न झाल्याने प्रतिष्ठानचे बँक खाते सील केल्याचे म्हटले जात आहे.