अशोक चव्हाणांना मोठा धक्का; भास्कर खतगावकर पुन्हा काँग्रेसमध्ये, मीनल खतगावकर, पोकर्णांचीही घरवापसी

अशोक चव्हाणांना नांदेडच्या राजकारणात मोठा धक्का बसला. माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर हे भाजपशी फारकत घेऊन पुन्हा काँग्रेसवासी झाले आहेत. त्यांच्यासोबतच डॉ. मीनल खतगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचीही घरवापसी झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत या सर्वांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

1976 मध्ये भास्कर पाटील खतगावकर यांनी सक्रीय राजकारण सुरू केले. तत्कालीन बिलोली विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी तीन वेळा नेतृत्व केले. काही काळ ते राज्यमंत्रीही होते. नांदेड लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार झाले. स्व. शंकरराव चव्हाण यांचे जावई आणि अशोक चव्हाण यांचे मेहुणे असलेल्या खतगावकरांनी नांदेड जिल्हय़ात काँग्रेस बळकट करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. 2019 मध्ये अशोक चव्हाणांशी मतभेद झाल्यानंतर खतगावकरांनी भाजपशी घरोबा केला. 2019 मध्ये प्रताप पाटील चिखलीकरांना निवडून आणण्यासाठी खतगावकरांनी आकाशपाताळ एक केले होते, परंतु चिखलीकरांशीही त्यांचे पटले नाही. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये परतले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीअगोदर पुन्हा खतगावकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने विधान परिषदेवर घेण्याचा शब्द फिरवल्याने आता खतगावकरांनी पुन्हा काँग्रेस जवळ केली आहे. भास्कर खतगावकर यांच्यासोबत त्यांच्या स्नूषा डॉ. मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.