प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पावन तपोभूमीतून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होत आहे. या सभेत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजप व मिंधे गटावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी ज्यांनी ज्यांनी शिवसेनेसोबत, उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली त्यांना या देवभूमीत गाडल्या शिवाय राहायचे नाही, असे आवाहन त्यांनी केले.
”मला आठवतंय 18 व 19 नोव्हेंबर 1994 रोजी शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थितीत याच मैदानावर सभा झाली होती. त्या सभेने 1995 साली राज्यात युतीची सत्ता आणली. त्यावेळी आपण विरोधकांशी लढत होतो. आता आपल्याला स्वकीयांकडे लढावं लागतंय. मला खात्री आहे की आजची ही सभा त्या सभेसारखीच ऐतिहासिक ठरेल व या सभेमुळे 2024 साली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणल्याशिवाय राहणार नाही. 1994 साली याच मैदानावर बाळासाहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केलेली. त्यामुळे याच मैदानवर आज मी भाषण करतोय त्यामुळे माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. त्यामुळे माझ्यासह सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे. कारण आता आपण स्वकीयांशी लढतोय, असे भास्कर जाधव म्हणाले.
”आम्ही जे प्रभू रामचंद्र लहानपणापासून पुस्तकात इतिहासात, पुराणातून पाहिले वाचले अतिशय नम्र शांत होते आदर्श बंधू व पुत्र होते, रयतेचा आदर्श राजा होते, पत्नीसोबत आयुष्यभर फिरले अशा रामाचं आमच्यासमोर उदाहरण आहे. आज जे रामाचे अक्राळविक्राळ रुप दाखवले जाते ते कधी आम्हाला शिकवले नव्हते. बिभीषणाने रामाची मदत केली त्यानंतर युद्ध जिंकल्यानंत रामाने ते राज्य बिभिषणाला दिले. आताच्या राज्यकर्त्यांसारखं ते राज्य बळकावलं नाही, अशा शब्दात त्यांनी मिंधेवर टीका केली.
यावेळी त्यांनी अयोध्येतील सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना आमंत्रित न केल्यावरून भाजपवर टीका केली आहे. ”राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू मॅडम या आदिवासी समाजाच्या असल्याचा ढिंडोरा पिटला जातो. प्रभू श्री राम चंद्राने शबरीने चाखलेली उष्टी बोरं देखील आदराने खाल्ली होती. पण आपल्या राष्ट्रपती मॅडमना संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात मान दिला नाही. या सोहळ्यात कार सेवकांना सन्मान नाही, शिवसेनेचं योगदान यांना मान्य नाही. यांच्याकडून सौजन्याची आम्हाला अपेक्षा देखील नाही. निमंत्रण देणं ही संस्कृती, सौजन्य असते. जे आज रामाचा वापर मतदाना करता करत आहेत त्यांच्याकडून सौजन्याची अपेक्षा आम्ही करत नाही. आम्ही फक्त प्रभू रामचंद्राचा आदर्श मानतो, अशी टीका जाधव यांनी केली.
या सोहळ्यात यांनी शंकराचार्यांना देखील डावलण्याचं काम केलं. सगळ्यात मोठा हिंदू धर्माचा अपमान हा दिल्लीतील राज्यकर्त्यांनी केला आहे. हिंदुत्व, 370 कलम, राम मंदिर,संसद भवन याचा एटीएम कार्डसारखा वापर करणाऱ्यांकडून आम्हाला कोणतीच अपेक्षा नाही. आपला धर्म काय आहे ते सांगणारे शंकराचार्य . हिंदू धर्माची दिक्षा ते देतात. त्या शंकराचार्यांचे हिंदु धर्मासाठी काय योगदान आहे असे यांचे लघू केंद्रीय मंत्री विचारतात. यांचे डोळे उघडे आहेत की बंद ते दिसत नाही ते प्रश्न विचारतात, असा सणसणीत टोला त्यांनी नारायण राणे यांना लगावला.
”ज्या अजित पवारांवर निधी देत नाही असा आरोप केला, त्याच अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.
जे सांगत होते बॉम्बस्फोटातील आरोपी नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसले असा आरोप आमच्यावर करत होते ते आता स्वत: त्यांच्यासोबत आहेत. मी नाही बाई त्यातली कडी लाव त्यातली असे दाखवण्यासाठी त्यांनी अजित पवारांना पत्र वगैरे लिहले पण हे किती बरबटले आहेत ते यावरून दिसतं, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.