कदम आणि चव्हाण यांनी कुस्ती लढवावी, मी पंच म्हणून काम करायला तयार – भास्कर जाधव

रामदास कदम आणि रविंद्र चव्हाण हे दोन्ही नेते माझ्या कोकणातील असून, या दोघांनीही रस्त्यावर येऊन कुस्ती लढावी. ती कुस्ती बघण्यासाठी मी तिथे येईल व त्यासाठी पंच म्हणून मी काम करायला तयार आहे असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते भास्करराव जाधव यांनी लगावला आहे. नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज शिवसेना नेते भास्करराव जाधव व उपनेते मनोज जामसुतकर हे सकाळी नांदेडला आले. त्यावेळी पत्रकारांशी भास्करराव जाधव बोलत होते.

भास्कर जाधव म्हणाले की, दुसर्‍या पक्षात काय चालू आहे, याकडेही माझे लक्ष नसते. मात्र रामदास कदम व रविंद्र चव्हाण हे दोघेही भाजपा नेते एकमेकांवर टीका करत आहेत. त्या सर्व टीका व आक्रमक बोलणे मी बारकाईने ऐकले आहे. त्यांचे व्हिडीओ पाहिले आहेत. मी कोकणातला असल्याने आता ते दोघे कधी रस्त्यावर येतील व त्यांची कुस्ती कधी होईल याकडे माझे लक्ष आहे. ज्या दिवशी हे दोघे एकमेकांसमोर येतील, त्यावेळी त्यांची कुस्ती बघण्याची माझी इच्छा आहे. जमल्यास मी त्याठिकाणी पंचगिरी करण्यास तयार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

लाडकी बहिण योजना सरकारने आणली असली तरीही यापूर्वी देखील संजय गांधी निराधार योजना, कन्यादान योजना, वयोवृध्दांसाठीची योजना, पेन्शन योजना पूर्वीच्या सरकारने आणल्या आहेत. त्यामुळे यात नविन काही नाही. त्यामुळे या योजनेचा या सरकारला काही फायदा होईल असे मला वाटत नाही. गवगवा करुन प्रसिध्दी करुन हि योजना आणली असली तरीही 21 वर्षापूर्वीच्या व 65 वर्षानंतरच्या बहिणी या सरकारच्या लाडक्या नाहीत का? असा सवाल त्यांनी केला. आशा वर्कर, अंगणवाडी या महिला त्यांच्या लाडक्या नाहीत का? केवळ गवगवा व प्रसिध्दीसाठी काही ठराविक बहिणींसाठी ही योजना आणल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेच्या प्रसिध्दीवर 999 कोटी रुपये हे सरकार खर्च करणार आहे. त्याचा फारसा उपयोग या सरकारला होईल असे आम्हाला वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री काय बोलतात, यापेक्षा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात ते दडपण्यासाठी, त्यात फुट पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले, हे उघड झाले आहे असे जाधव म्हणाले. तसेच आरक्षणाच्या संदर्भात आडकाठी कोण घालतो व हे आरक्षण मिळू नये यासाठी देवेंद्र फडणवीस हे कारणीभूत आहेत, त्यांचे कारस्थान आता उघड झाले आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, लोहा-कंधार, भोकर, मुखेड, देगलूर-बिलोली, हदगाव, किनवट, नायगाव या मतदारसंघाचा विधानसभानिहाय आढावा घेण्यासाठी मी आलो आहे. यापूर्वी शिवसेना-भाजपा युती असताना शिवसेना पक्षाने चार जागांवर आपले वर्चस्व सिध्द केले होते. त्यामुळे या चार जागांवर आमचा हक्क आहे, मात्र त्याचा पूर्ण अभ्यास करुन आपण पक्षश्रेष्ठींना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करु, असेही ते म्हणाले.