फिरस्ती – दुर्गनिर्मितीचा आविष्कार; भांडारदुर्ग!

>> प्रांजल वाघ

ब्रह्मगिरीच्या उत्तरेकडे एक एकलकोंडा किल्ला भांडारदुर्ग. त्र्यंबकगडाचा जोडकिल्ला असलेला भांडारदुर्ग प्राचीन दुर्गस्थापत्य शास्त्राचा मूर्तिमंत आविष्कार आहे. निसर्गाशी एकरूप होत किल्ल्याच्या संरक्षणाचे महत्त्व या दुर्गाच्या स्थापत्यात दिसून येते. शत्रूचे आक्रमण जरी झाले तरी मोजक्या शिबंदीनिशी लढवता येईल अशा या छोटेखानी जोडकिल्ल्याचे प्रवेशद्वार अजिबात दिसत नाही हेच याचे खास वैशिष्टय़.

त्र्यंबकगडाचा जोडकिल्ला म्हणजे भांडारदुर्ग. हा माझा पहिलाच सोलो ट्रेक. निघण्यापूर्वी हवी ती खबरदारी घेतलेली होती. प्रथमोपचार सामग्री, एक छोटी रोप स्लिंग, कॅराबिनर सोबत ठेवले होतेच. शिवाय त्र्यंबकेश्वर येथील पोलीस चौकीचा दूरध्वनी क्रमांक, अपघात झाल्यास रेस्क्यू हेल्पलाइन या सगळ्यांची माहिती घरी दिलेली होती. शिवाय पाणी आणि खाण्याचे पदार्थ मुबलक प्रमाणात होते. सरतेशेवटी परिसराची माहिती, गुगलवरून रेकी, किल्ल्याबद्दल पुस्तकात अथवा ब्लॉग्सवरून सविस्तर माहिती फोटोसहित अभ्यासली होती. तरीही सोलो ट्रेक असल्यामुळे मनात थोडी कालवाकालव होत होती.

भल्या पहाटे ब्रम्हगिरीच्या कोरीव पायऱ्या चढत निघालो आणि तास-दीड तासात माथ्यावर पोहोचलो. गोदावरी उगम मंदिर आणि हत्ती दरवाजा पाहून झाल्यावर मी माझा मोर्चा वळवला जटा मंदिराकडे. महादेव शंकराने आपल्या जटा जिथे आपटून गोदावरीला या भूमीवर आणले तीच ही जागा.

जटा मंदिरातील शंकरास नमस्कार करून आता पुढे निघायचे होते. मंदिर आणि एका पाण्याच्या टाक्यामधून जाणारी पायवाट धरली आणि वाढलेल्या गवतातून गडाच्या उत्तरेकडे निघालो. ब्रह्मगिरीच्या उत्तरेकडे एक एकलकोंडा किल्ला अथवा जोडकिल्ला आहे. प्राचीन दुर्गस्थापत्य शास्त्राचा मूर्तिमंत आविष्कार. निसर्गाशी एकरूप होऊन वास्तूनिर्मिती करतानाच किल्ल्याच्या संरक्षणाचे महत्त्व कसे टिकवून ठेवायचे याचे उत्तम उदाहरण.

पावसाळ्यातील वर्षावाने गड पुरता हिरवा झाला होता, पण अचानक चालता चालता रंग पालटू लागले. हिरव्याकच शालूच्या पदरावर जांभळीगर्द वेलबुट्टी उमटू लागली आणि आश्चर्याने तोंडात बोटे घालण्याची वेळ आली. माझ्यासमोर जांभळा गालिचा जणू अंथरला होता. सात वर्षांतून एकदा फुलणारी कारवी वनस्पती नेमकी मी किल्ल्यावर आलो असताना बहरली होती. इतकंच नव्हे तर या जांभळ्या फुलांकडे पाहण्यात गर्क असताना समोर ढगांचा पडदा बाजूला सरला गेला आणि भांडारदुर्गाने दर्शन दिले. दुग्धशर्करा योग म्हणावा तो हाच असणार.

भांडारदुर्गचे वैशिष्टय़ असे की, तो एक नैसर्गिक बुरूज आहे व मुख्य ब्रह्मगिरी आणि त्यामधील एकमेव दुवा म्हणजे त्या दोघांमधील अरुंद नैसर्गिक दगडी सेतू. शत्रूचे आक्रमण जरी झाले तरी मोजक्या शिबंदीनिशी लढवता येईल असा छोटेखानी जोडकिल्ला, पण या किल्ल्याचे खास वैशिष्टय़ असे की, याचे प्रवेशद्वार अजिबात दिसत नाही. चालता चालता डोंगर संपून जाईल असं वाटायला लागतं आणि आपण पावलं साशंकपणे टाकतो. इतक्यात उभे ठाकते ते कातळात उभे खोदलेले किल्ल्याचे द्वार. डोंगराच्या पोटात उभा कातळ लेण्यासारख्या कोरून जवळ जवळ 40 पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरून खाली गेल्यावर एक छोटं द्वार येतं, बहुधा ते बुजलं असावं. उत्खनन केलं तर ते एक पुरुष उंचीचं सहज असेल असं वाटतं. इथून बाहेर पडल्यावर आपण त्या दगडी पुलावर येतो. हा नैसर्गिक दगडी पूल म्हणजे 200 फूट उभी कातळ भिंत. इथून खाली वाकून पाहिलं तर डोळे फिरतात. उजवीकडे गंगाद्वार आणि त्र्यंबकेश्वर, तर डावीकडे किल्ल्यांनी नटलेला संपन्न असा विस्तीर्ण डोंगराळ परिसर. हा पूल ओलांडून पुढे गेलो की, डावीकडे एक छोटं अगदी जमिनीपासून दोन फूट उंचीचे द्वार दिसतं. इथून सरपटतच आत जावं लागतं. आत गेल्यावर विस्फारलेल्या नेत्रांनी आपण हा स्थापत्य शास्त्राचा नमुना पाहत राहतो. या बाजूसही कातळ खोदून वर चढणाऱ्या सुमारे 40 पायऱ्या आपल्याला गडावर घेऊन जातात.

गडावर पाहायला फारसे अवशेष नाहीत. स्फटिकासारखे स्वच्छ पाणी असलेली दोन टाक्या आहेत आणि गडाच्या उत्तर बाजूस एका दगडात खोदून काढलेला पाषाण बुरूज आहे. टेहळणीसाठी बांधलेला हा बुरूज त्र्यंबकेश्वर आणि त्याच्या उत्तरेच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जाई. किल्ल्याबद्दल फारशी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही, पण त्र्यंबकगडासोबत शिवाजी महाराजांनी हा किल्लादेखील 1670 मध्ये स्वराज्यात आणला.

बुरुजावरील थंड वाऱ्याने आणि समोरील विहंगम दृश्याने मला तिथेच खिळवून ठेवलं होतं, पण घडय़ाळाचे काटे निघण्याचा इशारा देत होते. नाईलाजाने काढता पाय घ्यावा लागला. या रुबाबदार गडपुरुषाचा निरोप घेत पावलं परत वळू लागली गड पायथ्याकडे, पण पुन्हा इथे येण्याचं स्वतला वचन देऊनच.

>> [email protected]