Bhandara News – गाडी पार्क करण्याच्या वादातून शेजाऱ्यावर कोयत्याने हल्ला; परस्परविरोधात गुन्हा दाखल

भंडारा शहराजवळ असलेल्या बेला गावात गाडी पार्क केल्याच्या वादातून शेजाऱ्याने शेजाऱ्यावरच कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात दोघांनी परस्परविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

भंडारा शहरापासून 5 किलोमिटर अंतरावर असलेल्या बेला गावात शेजाऱ्याने शेजाऱ्यावर कोयत्याने हल्ला करत त्याला जखमी केले आहे. अशोक नंदनवार यांनी रोषण जांगळे यांच्या घरासमोर रस्त्यावर चारचाकी गाडी उभी केली होती. त्याचवेळी जांगळे यांची गाडी आली. मात्र, नंदनवार यांच्या गाडीमुळे त्यांना गाडी काढता येत नव्हती. त्यामुळे जांगळे यांनी आपल्या गाडीतून कोयता काढत अशोक यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांना जखमी केले.

या घटनेत दोघांनी एकमेकांना मारहाण केल्याने त्यांनी परस्पराविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नागरिक स्वतः सोबत हत्यारे घेऊन कसे फिरतात, असा सवाल या घटनेमुळे उपस्थित होत आहे. याप्रकरणी पोलीस काय कारवाई करणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.