विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान इमारतीचे छत कोसळले, तीस ते चाळीस महिला जखमी

गणपती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी जीर्ण इमारतीवर चढून विसर्जनातील डी. जे. व झाक्यांचा आनंद घेत असतानाच अचानक जीर्ण इमारतीचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीस ते चाळीस महिला जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथे आज सायंकाळी सुमारास घडली. या घटनेत तीस ते चाळीस महिला किरकोळ जखमी झाल्या.

बारव्हा पेठ येथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे वतीने गणेश उत्सव मोठया धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. विसर्जनासाठी डी. जे. व विविधरंगी झाकी, लेझीमच्या तालावर भाविक भक्त थिरकत असतानाच अचानक जीर्ण इमारतीचे छत कोसळले. टिनाचे शेडखाली अनेक महिला उभ्या होत्या. त्यांच्यावर इमारतीचे छत कोसळले. मात्र सिमेंटचे छताखाली टिनाचे शेड असल्यामुळे नऊ महिला किरकोळ जखमी झाल्या. लागलीच जमावाने सर्व टिनाचे शेडच उचलून धरले व जखमींना तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बारव्हा येथे दाखल करण्यात आले.