भागोजीशेठ कीर यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा 

हिंदू धर्मरक्षक भागोजीशेठ कीर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी वरळीच्या बेंगाल केमिकल नाका ते दादर चौपाटी येथील भागोजीशेठ कीर स्मृतिस्थळ यादरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शेकडो आबालवृद्धांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला. ‘कर्णानंतरचा एकच दानवीर…भागोजीशेठ कीर भागोजीशेठ कीर’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदूमून गेला होता.

 हिंदू धर्मातील व्यक्तींच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी मुंबई शहरात जागेची आबाळ होती. त्यावेळी भागोजीशेठ कीर यांनी दादर येथे नऊ एकर जागा घेऊन स्मशानभूमी बांधून दान केली. देश पारतंत्र्यात होता त्यावेळी रत्नागिरी येथे पतितपावन मंदिर बांधले. प्रतिकूल जातीव्यवस्थेला गाडून टाकण्यासाठी स्वराज्य सहभोजनाला सुरुवात केली. हिंदुधर्मरक्षक, दानशूर भागोजीशेठ कीर यांचे कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी भागोजीशेठ कीर स्मृती समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवरात्रीला भव्य शोभायात्रा आणि अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी 5 वाजता वरळी येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता दादर चौपाटी येथे अभिवादन सभेला सुरुवात झाली. भागोजी कीर यांचे वंशज अंकुश कीर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, डॉ. जयप्रकाश पेडणेकर, नविनचंद्र बांदिवडेकर, विनोद चव्हाण, भागोजीशेठ कीर स्मृती समितीचे अध्यक्ष किशोर केळुसकर यांच्यासह भंडारी समाजबांधव मोठय़ा संख्येने यावेळी उपस्थित होते.