देशभरात उष्णतेची लाट आहे. अनेक शहरांत पारा 45 अंशाच्या पुढे गेला आहे. अशातच एसीचा स्फोट होऊन आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. दिल्लीमध्ये आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 30 मे रोजी पहाटे नोएडा हाऊसिंग सोसायटीमधील फ्लॅटमध्ये आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नोएडाच्या सेक्टर 63मधील कार्यालयातही एसीचा स्फोट झाला. निवासी, व्यवसाय आणि औद्योगिक इमारतींमध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांत एसीचा स्पह्ट होण्याची प्रकरणे नोंदवली गेल्याची माहिती गौतम बुद्ध नगरचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रदीप कुमार यांनी दिली. या प्रकरणी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेय.
काय खबरदारी घ्याल…
– घर आणि कार्यालयाची वायरिंग करताना नेहमी ब्रँडेड वायर वापरा.
– स्टॅबिलायजरशिवाय एसी वापरू नका.
– एसीचा कॉम्प्रेसर सावलीच्या ठिकाणी असू द्या.
– उन्हाळ्याच्या सुरुवातीला एसीची सर्विसिंग करून घ्या.
– एसीतून कोणत्याही प्रकारचा आवाज किंवा स्पार्क होत असेल तर लगेच तपासून घ्या.
– उपकरण सतत चालू ठेवू नका. पाच-सहा तास वापरल्यावर लगेच बंद करा. मुख्य पॉवरची बटणं काम झाल्यास आवर्जून बंद ठेवा.
– कॉम्प्रेसरमध्ये रेफ्रिजरेंट गॅसच्या गळतीमुळेदेखील स्पह्ट होऊ शकतो. त्यामुळे गॅस गळती होत आहे का, हे सातत्याने तपासा.
– दिल्ली – एनसीआरमध्ये आगीच्या घटना वाढल्या आहेत. अग्निशमन दलाकडे दिवसाला आगीशी संबंधित साधारण 200 कॉल येत आहेत. मागील 10 वर्षांतील हा सर्वाधिक आकडा असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱयाने सांगितले. मे महिन्यात दिल्लीतील आगीच्या घटनांमध्ये 12 जण दगावले आहेत. औद्योगिक भागातून, गोडाऊनमधून आगीशी संबंधित कॉलचे प्रमाण जास्त आहे. जर तापमान एक डिग्री जरी जास्त वाढले तर दिवसाला 250हून अधिक कॉल येतील. अग्निशमन दलाने ड्रोनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्याचे दिल्लीच्या अग्निशमन दल विभागाचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले.