इंग्रजी शपथविधीसाठी शुभेच्छाही इंग्रजीतूनच ! अर्जुन भालेकरांच्या फलकाने वेधले लक्ष

‘आय नीलेश ज्ञानदेव लंके, डोन्ट अंडरईस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन ! बेस्ट विशेस फ्रॉम अर्जुन जयवंत भालेकर,एम एस्सी, व्हाईस प्रसिडेंट एनसीपी, अहमदनगर’ अशा आशयाचा फलक खासदार नीलेश लंके यांच्या कार्यालयाबाहेर झळकला असून तो येणाऱ्या जाणारांचे लक्ष वेधून घेत आहे. खासदार नीलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीमधून शपथ घेतल्यानंतरही इंग्रजीचे कवित्व संपण्यास तयार नसून अर्जुन भालेकर यांनी इंग्रजीमधून दिलेल्या शुभेच्छांची तालुक्यात चांगलीच चर्चा झडत आहे.

यासंदर्भात अर्जुन भालेकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, लोकसभा निवडणूकीच्या काळात महाविकास आघाडीचे उमेदवार, आमचे नेते नीलेश लंके यांना इंग्रजीतून भाषण करून दाखवा असे आव्हान देत हिणवण्यात आले होते. लंके यांनी मात्र त्यास इंग्रजी बोलणारा खासदार हवा की तुमचे प्रश्‍न मांडणारा खासदार हवा असा प्रतिप्रश्‍न करीत प्रत्युत्तर दिले होते. या निवडणूकीत इंग्रजीचा मुद्दा चांगलाच गाजला. विरोधी भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखे यांचा पराभव करून खासदार नीलेश लंके हे संसदेत पोहचले. मंगळवारी त्यांनी इंग्रजीत शपथ घेत सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला.

भालेकर म्हणाले, खासदार नीलेश लंके यांनी आयटीआयचा फीटर कोर्स केलेला असला तरी त्यांनी पुढे कला शाखेतून पदवीही घेतलेली आहे. असे असताना ते सामान्य माणसाला, शेतकरी बांधवाला भावेल अशाच भाषेत संवाद साधतात. याचा अर्थ त्यांना इंग्रजी बोलताच येणार नाही असा काढणे साफ चुकीचे होते. अर्थात लंके यांनी प्रचारादरम्यान मी इंग्रजी बोलेन किंवा बोलणार नाही यावर भाष्य केले नव्हते. निकालानंतर मात्र त्यांनी संसदेत मी इंग्रजी बोलणार असे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे त्यांनी इंग्रजीत शपथ घेतली. त्याचा आम्हाला अभिमान असून म्हणूनच आपण हा फलक लावला असल्याचे भालेकर यांनी स्पष्ट केले.

खासदार लंके कर्तृत्व सिद्ध करणार
सन 2019 मध्ये विधानसभेमध्ये गेल्यानंतर नीलेश लंके यांना विधीमंडळाच्या कामकाजाचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र त्यांनी कामकाजाची माहीती घेऊन मतदारसंघात 1 हजार ५०० कोटी रूपयांपेक्षाही अधिक निधी खेचून आणला जे एक रेकॉर्ड आहे. संसदेत त्यांनी आताशी पाऊल टाकले आहे. विधासभेप्रमाणेच ते संसदेतही आपल्या कामचा ठसा उमटवून आपले कर्तृत्व सिद्ध करतील.
– अर्जुन भालेकर
उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस