‘बेस्ट’ वाचवण्यासाठी कामगार संघटनांची एकजूट, आयुक्तांकडे बैठकीची मागणी           

मुंबईची जीवनवाहिनी असणारी बेस्ट आर्थिक संकटात गेली असून बेस्टला वाचवण्यासाठी सर्व कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सकारात्मक चर्चा करावी, अशी मागणी संघटनांकडून आयुक्तांकडे करण्यात आल्याची माहिती ‘बेस्ट’ कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिली.

आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला वाचवण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. ‘बेस्ट’च्या निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठीदेखील उपक्रमाकडे पैसे नाहीत. ही आर्थिक सुधारणा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यामुळे बेस्ट प्रवासी वर्ग आणि बेस्ट उपक्रमातील कामगार यांच्याबाबत कशा प्रकारे नियोजन करून त्यांना न्याय देता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे सामंत म्हणाले. त्यासाठी तत्काळ ही बैठक आयोजित करावी, अशी मागणीही सामंत यांनी केली आहे.