कावेरी प्रश्न पेटला; आज बेंगळुरूत कडकडीत बंद, शाळा-बाजारपेठा बंद, विमान कंपन्यांनीही जारी केल्या सूचना

Bengaluru-bandh

कर्नाटकनं कावेरीचं पाणी तमिळनाडूला सोडल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बेंगळुरूमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.

शेतकरी नेते कुरुबुरु शांताकुमार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटना आणि इतर संघटनांना सोबत घेत ‘कर्नाटक जल संरक्षण समिती’ने बंदची हाक दिली आहे.

कावेरी समस्या काय आहे?

कावेरी नदीच्या पाण्याच्या वाटपाच्या मुद्द्यावरून तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये अनेक दशकांपासून वाद आहे.

तमिळनाडूला 13 सप्टेंबरपासून 15 दिवसांसाठी 5000 क्युसेक पाणी सोडण्यास सांगणाऱ्या कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (CWMA) आदेशाविरुद्ध कर्नाटक सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यानं अलीकडेच भडका उडाला आहे.

पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी स्वतःच्या गरजा असल्यानं ते पाणी सोडण्याच्या स्थितीत नसल्याचं कर्नाटक सरकारचं म्हणणं आहे.

कडक पोलीस बंदोबस्त

बंदच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरू पोलिसांनी सोमवारच्या मध्यरात्रीपासून मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत सीआरपीसीचे कलम 144 लागू केले. तसेच पोलिसांनी आज शहरातील मिरवणुकांना कोणतीही परवानगी दिलेली नाही.

बेंगळुरू पोलीस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, ‘कोणीही बळाचा वापर करून बंदची सक्तीने अंमलबजावणी करू शकत नाही, जर एखाद्याला स्वेच्छेने तो पाळायचा असेल तर ते पाळू शकतात’. याशिवाय शहराच्या सुरक्षेसाठी सुमारे 100 तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.

शाळा महाविद्यालये बंद

बंदच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरू शहरी जिल्ह्याचे उपायुक्त दयानंद के ए यांनी मंगळवारी शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. शहरातील बहुतांश खासगी शाळा आणि महाविद्यालयांनी सोमवारी विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली होती.

विमान कंपन्यांनी जारी केल्या सूचना

बेंगळुरू बंदच्या पार्श्‍वभूमीवर बेंगळुरू विमानतळाने प्रवाशांना ‘त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन’ करण्याची विनंती करणारा सल्ला जारी केला आहे. याशिवाय इंडिगो एअरलाइन्सने प्रवाशांना विमानतळावर नियोजित वेळेपेक्षा लवकर पोहोचण्याचा विनंतीही केली आहे, जेणेकरून विमान उड्डाणांवर त्याचा प्रभाव पडणार नाही.

‘बेंगळुरूमध्ये जाहीर केलेल्या बंदमुळे बेंगळुरू विमानतळावर प्रवासासाठी सामान्यपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. आम्ही देशांतर्गत किमान 2.5 तास आधी आणि आंतरराष्ट्रीय निर्गमन करण्यापूर्वी 3.5 तास आधी पोहोचण्याची शिफारस करतो’, असे इंडिगोने ट्विटर वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.