पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचार, TMC च्या चार कार्यकर्त्यांची हत्या

पश्चिम बंगालमध्ये आज पंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. 22 जिल्ह्यातील 63 हजार 229 ग्रामपंचायतीच्या जागा, 9 हजार 730 पंचायत समितीच्या जागा आणि जिल्हा परिषदेच्या 928 जागांवर मतदान सुरू आहे. मात्र या निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. पंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यापासून (8 जून ते 7 जुलै) गेल्या महिन्याभरात झालेल्या हिंसाचारामध्ये 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्थिती आणखी गंभीर होऊ नये म्हणून राज्यभरात 1.35 लाख जवानांना तैनात करण्यात आले आहे.

गेल्या 24 तासांमध्ये बंगालमध्ये चाकूहल्ला, बॉम्बहल्ला आणि गोळीबारामध्ये तृणमूल काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. यातील तीन घटना मुर्शिदाबाद, तर एक घटना कुचबिहार येथे घडली. मुर्शिदाबादमधील बेलडांगा येथे शनिवारी सकाळी टीएमसी कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री खारग्राम येथे चाकू भोसकून, तर रेजीनगर येथे बॉम्ब फोटून एकाची हत्या करण्यात आली. तर कुचबिहार येथील तुफानगजं येथे आजच सकाळी चाकू भोसकून टीएमसी कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. यामुळे येथे सध्या तणावाचे वातावरण आहे.

भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला

पूर्व मेदिनापूर भागातही हिंसाचार आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. सोनाचुरा ग्रामपंचायतीचे एआयटीसी बूध अध्यक्ष देवकुमार राय यांनी भाजप कार्यकर्ते सुबल मन्ना आणि त्यांच्या नेत्यांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. अंधारा फायदा उठवत मारहाण केल्याचा दावा त्यांनी केलाय.

मतदान संपलं, सीपीआयएम सचिवांची उद्विग्न प्रतिक्रिया

दरम्यान, सीपीआयएम राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी हिंसाचाराच्या घटनांवर प्रतिक्रिया देताना मतदान संपल्याचे म्हटले. त्यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यात बॅलेट पेपर रस्त्यावर पडल्याचे दिसतेय.